मिंधे गटात वाद, लोकसभेच्या उमेदवारीवरून गजानन किर्तीकर व रामदास कदमांमध्ये जुंपली

शिवसेनेसोबत गद्दारी करून मिंधे गटात गेलेले खासदार गजानन किर्तीकर व रामदास कदम यांच्यात मुंबईतील उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून जुंपली आहे. ‘गजानन कीर्तिकर यांचं वय झालं आहे. त्यामुळे गजानन कीर्तिकर उभे राहिले नाहीत, तर सिद्धेश कदम उमेदवारी मागतील’, असे वक्तव्य रामदास कदम यांनी केले. त्यामुळे गजानन किर्तीकर वैतागले असून त्यांनी थेट रामदास कदमांवर निशाणा साधला. सिद्धेश कदम यांना उमेदवारी द्यायचा विचार जरी झाला तरी मी स्वत:त्याला विरोध करेन, असे गजानन किर्तीकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले आहे. त्यामुळे आता निवडणूकीच्या तोंडावर मिंधे गटातील धुसफूसही समोर आली आहे.

”माझ्या मतदारसंघात मी गेल्या पाच वर्षात 100 कोटींची विकासकामे केली आहेत. पक्षात काही माणसं आली असून नेतृत्व करत आहेत. त्यांचे काही छुपे अजेंडे असू शकतात. सिद्धेश कदमसाठी रामदास कदम बोलले. पण, एकाच घरात दोन भावांना तिकीट देता येते का? पक्षानं तिकीट द्यायचं ठरवलं, तर मी विरोध करणार आहे. पक्षाला मला तिकीट द्यायचं नसेल, तर कुठल्यातरी चांगल्या व्यक्तीला द्यावे,” असेही गजानन कीर्तिकर यांनी म्हटलं.

”मी 36 विधानसभा मतदारसंघात आढावा बैठक घेतली. त्याचा अहवालही सादर केला. त्या अहवालाचे काय झाले माहित नाही? मी संघटना बांधणीसाठी पुढाकार घेतला होता. पण, संघटना बांधणीसाठी संधी दिली जात नाहीए,” अशी खंतही गजानन कीर्तिकर यांनी व्यक्त केली.