गुजरातच्या कृषी मंत्र्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका, आयसीयूमध्ये उपचार सुरू

गुजरात कृषी मंत्री राघवजी पटेल (Gujarat Agriculture Minister Raghavji Patel) यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आला आहे. त्यांच्यावर राजकोटमधील सिनर्जी रुग्णालयात (Rajkot Synergy Hospital) उपचार सुरू आहे. सध्या राघवजी यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले असून डॉक्टरांचे पथक त्यांच्या तब्येतील लक्ष ठेऊन आहे.

शनिवारी रात्री राघवजी पटेल यांना बोलताना त्रास जाणवत होता. तसेच पाठीतही वेदना होत होत्या. त्यामुळे सुरुवातीला त्यांना जामनगरच्या जीजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतर त्यांना राजकोटच्या सिनर्जी रुग्णालयात हलवण्यात आले. येथे सीटी स्कॅनमध्ये त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर डॉक्टरांच्या पथकाने त्यांच्या काही चाचण्यात केल्या असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती, सिनर्जी रुग्णालयाने दिली आहे. ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेने या संदर्भात ट्विट करून माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, राघवजी पटेल हे शनिवारी रात्री जामनगर जिल्ह्यातील बेराजा गावात भाजपच्या योजनांची माहिती देण्यासाठी गेले होते. याच दरम्यान त्यांना त्रास जाणू वागला. त्यानंतर रात्री साडे दहाच्या सुमारास त्यांना जामनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सिनर्जी रुग्णालयात रेफर करण्यात आले. पहाटे चारच्या सुमारास त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आयसीयूत उपचार सुरू असल्याची माहिती, डॉ. न्यूरोसर्जन संजय तिलाला यांनी दिली.
कोण आहेत राघवजी पटेल?
aराघवजी पटेले हे जामनगर ग्रामीण मतदारसंघाचे आमदार आहेत. काँग्रेसला रामराम करून 2017मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2017मध्ये झालेल्या राज्यसभा निव़डणुकीत राघवजी पटेल यांनी काँग्रेस उमेदवार अहमद पटेल यांच्या विरोधात मतदान केले होते, अर्थात त्यानंतरही अहमद पटेल यांनी विजय मिळवला. त्यानंतर भाजप प्रवेश करत राघवजी पटेल यांनी 2017 ची निवडणूक लढवली. मात्र काँग्रेस उमेदवार वल्लभ धाराविया यांनी त्यांचा पराभव केला. मात्र धाराविया यांनी काही काळाने राजीनामा दिल्याने ती जागा रिक्त झाली. येथे 2019मध्ये पोटनिवडणूक लागली आणि राघवजी पटेल विजयी झाले. त्यानंतर 2022 ला झालेल्या निवडणुकीतही त्यांनी विजय मिळवला.