गीताबोध – विषादावस्था…

>> गुरुनाथ तेंडुलकर

कुरुक्षेत्रावर रणांगणामध्ये युद्धासाठी सज्ज असलेले पितामह भीष्माचार्य, गुरू द्रोणाचार्य, दुर्योधन-दुःशासन-शकुनी-कर्ण, मित्र अश्वत्थामा तसंच स्वतच्या सैन्यात उपस्थित आपले सख्खे भाऊ, आपले मुलगे, सासरे-मेव्हणे-सगेसोयरे या सगळ्यांना एकत्र पाहून अर्जुनाच्या मनात एकच गोंधळ माजला. तो अचानक संभ्रमित झाला. त्याच्या या मनोदशेचं वर्णन करणारे भगवद्गीतेतील श्लोक आपण नीट समजून घेऊ या.

सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति ।

वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते ।। 29 ।।

गांडीवं स्त्रंसते हस्तात त्वक च एव परिदह्यते

न च शक्नोमि अवस्थातुम् भ्रमति इव च मे मन ।। 30 ।।

निमित्तनि च पश्यामि विपरीतानि केशव ।

न च श्रेय अनुपश्यामि हत्वा स्वजनम् आहवे ।। 31 ।।

भावार्थ – हे कृष्णा, माझे अवयव गळून पडत आहेत. माझ्या तोंडाला कोरड पडली आहे. शरीराला कंप सुटला आहे. अंगावर रोमांच उभे राहिले आहेत.

माझ्या हातातील गांडीव धनुष्य गळून पडत आहे. त्वचेचा दाह होत आहे. तसंच माझं मन भ्रमिष्टासारखं झालं आहे. मी धड उभादेखील राहू शकत नाही.

हे केशवा, मला सगळी चिन्हे विपरीत दिसत आहेत. युद्धात आप्तांना मारून माझे कल्याण होईल असं मला वाटत नाही.

अर्जुनाची ही सारी लक्षणं म्हणजे मन भरकटलेल्या मनोरुग्णाची प्राथमिक चिन्हं आहेत. माणूस जेव्हा द्विधा मनःस्थितीत असतो आणि नेमकं काय करावं याचा निर्णय घेता येत नाही, त्या वेळी अशा प्रकारची लक्षणं आढळतात. मग अशा वेळी सामान्य माणूसही काम न करण्यासाठी सतराशे साठ बहाणे शोधतो.

वास्तविक अर्जून हा योद्धा आहे. त्याच्यासाठी युद्ध हा प्रकार काही नवीन नाही. त्याने पूर्वी अनेक युद्धांत भाग घेतला होता. अनेक शत्रू मारले  होते. त्यामुळे तो अहिंसावादी होता अशातलाही भाग नाही. तसंच हे कुरुक्षेत्रावर होऊ घातलेलं युद्ध आपण कोणाबरोबर करणार आहोत याची त्याला पूर्वकल्पना नव्हती अशातलाही भाग नाही. त्याला कोण कोणत्या पक्षात आहेत हे चांगलंच ठाऊक आहे. तरीही प्रत्यक्ष युद्धाची वेळ येताच त्याचं सगळं अवसान गळून पडलं. तो संभ्रमित झाला. युद्धाची भीषणता त्याला अचानक जाणवली.

या मनोवृत्तीचं वर्णन श्री ज्ञानेश्वर माऊली अगदी योग्य शब्दांत करताना म्हणतात,

तेथ मनी गजबज जाहली ।  आणि आपैसी कृपा आली ।

तेणे अपमाने निघाली ।  वीरवृत्ती ।।1 – 985 ।।

भावार्थ – त्यामुळे अर्जुनाचे मन गडबडले. त्याच्या अंतकरणात दयेचा उद्भव झाला आणि दयेचा उद्भव म्हणजे आपला अपमानच आहे असे वाटून की काय, मूळची त्याची वीरवृत्ती अर्जुनाच्या अंतकरणास सोडून गेली.

तैसे अर्जुना तेथ जाहले ।  असतें पुरुषत्व गेलें ।

जें अंतकरण दिधले ।  कारुण्यासी ।। 1 – 89 ।।

भावार्थ – सैनिकाने युद्ध करताना कधीही समोरच्या शत्रूच्या मृत्यूचे काय परिणाम होतील, त्याच्या कुटुंबाचं काय होईल अशा प्रकारचे विचार मनात आणायचेच नसतात. तिथं एकच विचार असतो. स्वतला वाचवायचं आणि समोरच्या शत्रूचा निपात करायचा, पण अर्जुनाच्या अंतकरणात करुणा निर्माण झाली आणि त्यामुळे त्याचं पुरुषी क्षात्रतेज लोप पावलं. त्याचा धीर सुटला. युद्धाचं अवसानच गळून गेलं.

यावर भाष्य करताना ओशो म्हणतात की, अर्जुनाची अवस्था दोन्ही बाजूंना बैल जुंपलेल्या बैलगाडीसारखी झाली आहे. एकीकडे त्याला युद्ध करून आपलं हक्काचं राज्य परत मिळवायचं आहे, पण त्याचबरोबर आप्तेष्टांना मारावं लागेल म्हणून त्याचं मन माघार घेत आहे. त्याचा विरोध हा स्व-विरोध आहे.

असा स्व-विरोध असणारा माणूस हा नेहमीच संभ्रमित असतो. इंग्रजीत ज्याला ‘कन्फ्यूज स्टेट ऑफ माइंड’ म्हणतात ती अवस्था. आज आपल्या समाजात अनेक अर्जुन पाहायला मिळतात. दैनंदिन जीवनातील छोटे छोटे निर्णय घेतानासुद्धा त्यांचा गोंधळ उडतो. अडाणी-अशिक्षित माणसांबद्दल मी बोलत नाही, तर चांगली शिकले-सवरलेले, नोकरी-व्यवसाय करणारे मध्यमवर्गीय आणि मध्यमवयीन लोकदेखील अनेक बाबतीत निर्णय घेताना गोंधळलेले आपण पाहतो. आपल्या आसपासचं वातावरणदेखील या गोंधळात भर टाकतं. सतत दाखवल्या जाणाऱया बाजारू जाहिराती, सिनेमा-सीरियलमधून दाखवले जाणारे भडक नातेसंबंध, त्यामुळे घराघरातील प्रदूषित झालेले-संशयित वातावरण, वर्तमानपत्रांतून येणाऱया उलटसुलट बातम्या, त्यात भरीस भर म्हणून अत्यंत खालच्या पातळीवर गेलेलं राजकारण  या सगळ्यांचा परिणाम होऊन माणसाचं मनच हरवलंय. त्याचं एक यंत्र झालं आहे. स्वतचा विचार करून निर्णय घेण्याची क्षमता गमावलेलं यंत्र. असे मध्यमवयीय जेव्हा तरुण पिढीसमोर पालक म्हणून येतात त्या वेळी ती तरुण पिढीदेखील गोंधळलेलीच निपजणार यात काय आश्चर्य! दुर्दैवाची गोष्ट म्हणजे गोंधळलेल्या पिढीला मार्गदर्शन करणारे शिक्षकदेखील अनेकदा स्वतच गोंधळलेले असतात. म्हणूनच आज वस्तीवस्तीत, समाजात-घराघरांत कृष्ण निर्माण व्हायला हवेत. त्यासाठी पहिली सुरुवात स्वतपासून करायला हवी.

असो. अर्जुनाच्या मनातील गोंधळ, त्या गोंधळामुळे त्याने युद्धातून ऐन वेळी घेतलेली माघार आणि त्यासाठी त्याने दिलेली कारणं आपण पुढच्या लेखात पाहू.