हापूसला अवकाळीचा फटका; बागायतदारांच्या तोंडचा घास गेला, बाजारात दर कोसळले

राज्याच्या विविध भागात पडलेल्या अवकाळी पावसाचा मोठा फटका कोकणातील हापूस आंब्याला बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे रायगड, कुडाळ, देवगड परिसरात अनेक आंब्याची झाडे मुळापासून उखडून पडली आहेत. पाऊस आणि उष्णतेत वाढ झाल्यामुळे आंबा काळा पडण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्याचा परिणाम दरावर झाला आहे. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये हापूसचा दर अडीचशे ते पाचशे रुपये किलोच्या दरम्यान आला आहे. अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूसचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आला असताना राज्यभर अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. पाऊस आणि वादळी वारा याचा जोरदार फटका हापूस आंब्याला बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे देवगड आणि अलिबागमधील आंब्याच्या बागांमध्ये झाडांखाली कैऱ्यांचा सडा पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यापूर्वीच्या तुलनेत यंदा हापूसचा हंगाम लवकर सुरू झाला. त्यामुळे दर चांगले मिळतील अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र शेतकऱ्यांची निराशा झाली. संपूर्ण हंगामात हापूसला बाजारात पाहिजे तसा उठाव राहिला नाही. परिणामी पेटीचा दर दीड ते अडीच हजार रुपयांच्या दरम्यान राहिला. त्यातच हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना राज्यात अवकाळी पाऊस सुरू झाला. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या या पावसामुळे झाडावर असलेल्या कैऱ्या खाली पडल्या. पाऊस लागलेला आंबा काळा पडण्याचे प्रमाण वाढले आहे. परिणामी एपीएमसी मार्केटमध्ये हापूसचे दर कमी झाले आहेत.