सूर्य आग ओकतोय; रस्ते, रेल्वे, ‘बेस्ट’ ओस! उन्हाची दहशत, मुंबईत दुपारची ‘संचारबंदी’

गेल्या काही दिवसांपासून तळपणाऱ्या सूर्याने आता अक्षरशः आग ओकायला सुरुवात केल्याने मुंबईकरांनी धसका घेतला आहे. सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत रस्ते ओस पडत असून रेल्वे आणि ‘बेस्ट’मधील प्रवासीही घटले आहेत. मुंबईत तापमानाचा पारा 32 अंशांपर्यंत असला तरी दमट हवामानामुळे उकाडा वाढल्याचे तज्ञांकडून सांगण्यात येत आहे. पुढील काही दिवस हीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आल्यामुळे नागरिकांनी तब्येतीची काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

राज्याच्या अनेक भागांत पाऱ्याने थेट 42 अंशांवर झेप घेतल्याने नागरिकांचा अक्षरशः घामटा निघत आहे. सोलापूर-मालेगावमध्ये सध्या सर्वाधिक म्हणजे 43 अंशांवर पारा गेल्याने या ठिकाणी ‘उष्माघाताचा अलर्ट’ हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. तर सांगली-40 अंश सेल्सिअस, उदगीर-41 अंश सेल्सिअस, बीड-40 अंश सेल्सिअस, ठाणे-38 अंश सेल्सिअस, परभणी-जळगाव-जालना – 41 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदवले गेले आहे. मुंबईत 30 ते 32-34 अंश सेल्सिअस तापमान असले तरी आर्द्रतेमुळे पाऱ्याने चाळिशी गाठल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे. यामुळे मुंबईकर घराबाहेरील कामे सकाळी 10 वाजेच्या आधी आणि 4 वाजेनंतर करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे दुपारच्या वेळी अक्षरशः ‘जमावबंदी’ असल्याचा  भास होत आहे.

मुंबईत पुढील तीन ते चार दिवसांनंतर तापमानात आणखी वाढ होण्याचा अंदाज आहे. राज्यात सोलापूर, दक्षिण कोकणात मात्र अजून काही दिवस तापमान वाढलेले राहणार असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी.

सुषमा नायर, आयएमडी, मुंबई

पालिका सज्ज

वाढत्या उकाडय़ामुळे उष्माघातासारखे प्रकार होऊ नयेत यासाठी पालिकेने उष्माघात नियंत्रण आणि प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. सर्व प्रमुख रुग्णालयांमध्ये उष्माघातबाधित रुग्णांसाठी 14 प्रमुख रुग्णालयांत ‘कोल्ड रूम’ बेड तैनात करण्यात आले आहेत. शिवाय पालिकेच्या हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दवाखान्यांमध्येही वातानुकूलित व्यवस्था करण्यात आली आहे.

मुंबईची जीवनवाहिनी असणारी रेल्वे आणि ‘बेस्ट’मध्ये दुपारच्या वेळी तुरळक प्रवासी दिसत आहेत. रेल्वेचे दररोजचे प्रवासी 70 लाखांवर आहेत. यात उन्हाच्या वेळी 5 ते 10 टक्क्यांची कमी दिसून येत आहे. तर ‘बेस्ट’ प्रवाशांची एकूण 30 ते 32 लाख दररोजच्या प्रवाशांची संख्या 28 लाखांवर आली आहे.

असा करा बचाव

  • दुपारी 12 ते सायं. 4 वाजेपर्यंत शक्यतो घरात थांबा.
  • उन्हात गेल्यास टोपी, रुमाल किंवा छत्री वापरावी.
  • घराबाहेरील कामे सकाळी 10 च्या आत किंवा सायंकाळी 4 नंतर करा.
  • पांढरे, सौम्य रंगाचे, सैलसर कपडे वापरा, डोक्यावर टोपी घाला. थेट येणारा सूर्यप्रकाश, उन्हाला टाळावे.
  • पुरेसे पाणी प्यावे, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी असे द्रव पदार्थ घ्या.
  • उन्हात चप्पल न घालता चालू नये,  चहा, कॉफी इत्यादी गरम पेय टाळावीत.