World Cup 2023 – इंग्लंडचा अनोखा विक्रम, वन डे क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं

विश्वचषकातील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंडमध्ये अहमदाबादमध्ये होत आहे. या सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडने 50 षटकांत 9 गडी गमावून 282 धावा केल्या आहेत. त्यांनी न्यूझीलंड संघासमोर विजयासाठी 283 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. या सामन्यात इंग्लंडच्या सर्वच्या सर्व 11 खेळाडूंनी दोन अंकी धावसंख्या उभारली आहे. आतापर्यंतच्या एकदिवसीय सामन्यात हा विक्रम आहे. प्रत्येक खेळाडूने दोनअंकी धावसंख्या उभारण्याचा विक्रम इंग्लंडच्या संघाने केला आहे.

इंग्लंडचे कर्णधारपद जॉस बटलरच्या हाती आहे. तर केन विल्यमसन न्यूझीलंडची कमान सांभाळत आहे. मात्र, विल्यमसन इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात खेळत नसल्याने टॉम लॅथम या सामन्यात संघाचे नेतृत्व करत आहे. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंड संघाने 50 षटकांत नऊ गडी गमावून 282 धावा केल्या. त्यांनी न्यूझीलंडला 283 धावांचे लक्ष्य दिले आहे. इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रूटने सर्वाधिक 77 धावा केल्या. त्याच्याशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाला 50 धावांचा टप्पा गाठता आला नाही. कर्णधार जोस बटलरने 43 धावा केल्या. जॉनी बेअरस्टोने 33, हॅरी ब्रूकने 25 आणि लियाम लिव्हिंगस्टोनने 20 धावा केल्या. आदिल रशीदने नाबाद 15, डेव्हिड मलान आणि सॅम कुरनने 14-14, मार्क वुडने नाबाद 13, मोईन अली आणि ख्रिस वोक्सने 11-11 धावा केल्या. या संघातील 11 खेळाडूंनी दोन अंकी धावसंख्या उभआरत एकदिवसीय सामन्यात विक्रम केला आहे.

या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी इंग्लंडच्या फलंदाजांवर दबाव कायम ठेवला. वेगवान आणि फिरकीच्या मिश्रणाने इंग्लिश संघाला धावा करणे अवघड होत होते. वेगवान गोलंदाज मॅट हेन्रीने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. फिरकीपटू मिचेल सँटनर आणि ग्लेन फिलिप्स यांना प्रत्येकी दोन यश मिळाले. ट्रेंट बोल्ट आणि रचिन रवींद्र यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. इंग्लंडच्या संघाने न्यूझीलंडच्या संघासमोर विजयासाठी मोठी धावसंख्या ठेवली नसली तर एकदिवसीय सामन्यात त्यांनी अनोखा विक्रम केला आहे.