world-cup-2023- IND vs ENG – इंग्लंडने टॉस जिंकला! जोस बटलरचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय

एकदिवसीय विश्वचषक 2023 च्या 29व्या सामन्यात टीम इंडियाचा सामना गतविजेत्या इंग्लंडशी होत आहे. या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित शर्माने संघात कोणताही बदल केलेला नाही. तसेच जोस बटलरनेही इंग्लंडच्या संघात बदल केलेला नाही.

या विश्वचषकात इंग्लंडने जरी आतापर्यंत काही विशेष कामगिरी केली नसली तरी, हा संघ कोणत्याही संघाला पराभूत करू शकतो. हा सामना लखनऊच्या अटलबिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर खेळवला जात आहे. गुणतालिकेत टीम इंडियाचे पाच सामन्यांत 10 गुण आहेत. इंग्लंडनेही तेवढेच सामने खेळले असून त्यांच्या खात्यात केवळ दोन गुण आहेत. आणखी एक पराभव झाल्यास ते उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. त्यामुळे त्यांच्यासाठी हा सामना महत्त्वाचा आहे.

टीम इंडिया सलग सहाव्या विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे. हा समाना जिंकून टीम इंडियाचा उपांत्य फेरी गाठण्याचा प्रयत्न असेल. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा रविवारी एकाना क्रिकेट स्टेडियमवर इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात कर्णधार म्हणून 100 एकदिवसीय सामने पूर्ण करणार आहे. रोहितने आतापर्यंत 99 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले असून इंग्लंडविरुद्धचा हा सामना त्याच्या कर्णधारपदाचा 100 वा सामना असेल.

लखनऊमध्ये हा विश्वचषकातील चौथा सामना असेल. आतापर्यंत येथे तीन सामने खेळले गेले आहेत. लक्ष्याचा पाठलाग करणारा संघ तीनपैकी दोन सामने जिंकतो. इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करेल, असे मानले जात आहे. या विश्वचषकात भारताने ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडचा पराभव केला आहे. विजयाची मालिका कायम ठेवण्यासाठी टीम इंडिया लखनऊमध्ये सज्ज झाली आहे. टीम इंडियाने 20 वर्षांनंतर पुन्हा एकदा एकदिवसीय विश्वचषकात इंग्लंडला हरवायचा निर्धार केला आहे.