हिंदुस्थानने पटकावली 18 पदके!

यजमान हिंदुस्थानने राष्ट्रकुल वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत एकूण 18 पदके जिंकून आपले अभियान संपविले. यात 8 सुवर्ण, 8 रौप्य व 2 कांस्यपदकांचा समावेश आहे.

रविवारी स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी गतवर्षीच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या लवप्रीत सिंहने 109 किलो वजनी गटात रौप्यपदकाची कमाई केली. महिला गटात पूर्णिमा पांडे हिने 87 किलोहून अधिक वजनी गटात कांस्यपदक जिंकले. सकाळच्या सत्रात लवप्रीत सिंहने 341 किलो (स्नॅचमध्ये 154, क्लिन ऍण्ड जर्कमध्ये 187 किलो) वजन उचलून दुसरे स्थान पटकावले. फिजीच्या तनिएला रॅनिबोगीने 363 किलो (स्नॅच – 163, क्लिन ऍण्ड जर्क – 200 किलो) वजन उचलून सुवर्णपदक जिंकले. ब्रिटनचा ऍण्ड्रय़ू ग्रिफिथ्स कांस्यपदकाचा मानकरी ठरला. त्याने एकूण 340 किलो (स्नॅच 155, तर क्लिन ऍण्ड जर्क 185 किलो) वजन उचलले.

महिला गटात हिंदुस्थानच्या पूर्णिमा पांडेने 87 किलोहून अधिक वजनी गटात एकूण 227 किलो (स्नॅच 102, क्लिन ऍण्ड जर्क 125 किलो) वजन उचलून कांस्यपदक जिंकले. समोआच्या इउनियारा सिपैयाने सुवर्णपदक (एकूण 262 किलो ः स्नॅच 110, तर क्लिन ऍण्ड जर्क 152 किलो) जिंकले, तर समोआ देशाच्याच लेसिला फियापुले हिने रौप्यपदकाची कमाई केली.

गोळाफेकीत दोन पदके
गोळाफेक प्रकारात महिलांनी हिंदुस्थानला दोन पदके जिंकून दिली. चीनच्या झाओ जेईने 69.39 मीटर गोळाफेक करीत सुवर्ण पदक जिंकले. आभा कठुआ (18.06 मीटर) व मनप्रीत कौर (17.00 मीटर) या हिंदुस्थानी खेळाडू अनुक्रमे रौप्य व कास्य पदकाच्या मानकरी ठरल्या.

भालाफेकीत रौप्य पदक
पुरुषांच्या भालाफेकीत मुनेने 81.01 मीटर भालाफेक करीत हिंदुस्थानला रौप्य पदक जिंकून दिले. जपानचा रॉड्रिक जेनकी (83.15 मीटर) सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला, तर पाकिस्तानच्या मुहम्मद यासीरला (81.01 मीटर) कास्य पदक मिळाले.

400 मीटर रिलेत दोन पदके
4 बाय 400 मीटर शर्यतीत हिंदुस्थानच्या पुरुष संघाने 3 मिनिटे 01.80 सेंकद वेळेसह रौप्य पदकाची कमाई केली. महिला गटात हिंदुस्थानला कास्य पदक मिळाले.