IPL 2024 : ‘हा’ खेळाडू टीम इंडियाचा भविष्याचा कर्णधार, रॉबिन उथप्पाने केला मोठा दावा

रविवारी (26 मे 2024) पार पडलेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात कोलकाताने हैदराबदाचा एकतर्फी पराभव केला. या विजयासह तब्बल दहा वर्षानंतर कोलकाताने तिसऱ्यांदा आयपीएलच्या विजेतेपदावर मोहर उमटवली. या विजयामुळे कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरवर सर्व स्तरातून कौतुकांचा वर्षाव केला जात आहे. टीम इंडियाचा माजी खेळाडू रॉबिन उथप्पाने श्रेयस अय्यर टीम इंडियाचा भविष्याचा कर्णधार असल्याचे म्हणत त्याचे कौतूक केले आहे.

दहा संघांमध्ये रंगलेला आयपीएलचा रणसंग्राम रविवारी (26 मे 2024) संपुष्टात आला. दहा वर्षांनी कोलकाताने आयपीएलच्या किताबावर तिसऱ्यांदा मोहर उमटवली. 2012 व 2014 मध्ये गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली कोलकाताने आयपीएल जिंकली होती. तर यंदा (IPL 2024) श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली KKR ने आपले वर्चस्व सिद्ध केले. विशेष म्हणजे दोन वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली आयपीएलचे विजेतेपद पटकावणारा कोलकाता हा पहिलाच संघ ठरला आहे. श्रेयस अय्यरने संपूर्ण हंगामात शांत आणि संयमी खेळ करत कर्णधार पदाची भुमीका चोख पार पाडली. गौतम गंभीरचे मार्गदर्शन, श्रेयसने घेतलेले अचूक निर्णय आणि सर्व खेळाडूंनी घेतलेल्या मेहनतीमुळे कोलकाताने विजेतेपदावर आपले नाव कोरले. श्रेयस अय्यरच्या खेळावर आणि त्याने कर्णधार म्हणून बजावलेल्या भुमिकेवर टीम इंडियाचा माजी खेळाडू आणि आयपीएलमध्ये KKR च्या फ्रेंचायची टीमचा भाग राहिलेल्या रॉबिन उथप्पाने श्रेयस अय्यरचे तोंडभरून कौतूक केले आहे.

जियो सिनेमाशी बोलताना उथप्पाने श्रेयस अय्यरचे कौतुक केले. “मला सांगावस वाटत आहे. श्रेयस अय्यर आगामी काळात टीम इंडियाचे नेतृत्व करेल. मला अस वाटतय की तो या शर्यतीत आघाडीवर आहे, कदाचीत शुभमन गिलच्या सुद्धा पुढे. संघाला कस हाताळायच हे त्याला चांगले माहित आहे. या हंगामात तो खूप काही शिकला आहे. तो गौतम गंभीर, चंद्रकांत पंडित, अभिषेक नायर यांच्यासारख्या लोकांसोबत काम करत आहे,” असे म्हणत रॉबीन उथप्पाने श्रेयस अय्यरचे तोंड भरून कौतुक केले. तसेच त्याच्यामध्ये भविष्यात टीम इंडियाचा कर्णधार होण्याची क्षमता असल्याचे म्हंटल आहे.