IPL 2024 – विराटच्या खांद्यावर RCB चं ओझं, कोट्यवधी मोजलेले ‘हे’ 5 खेळाडू ठरताहेत डोक्याला ताप

तारीख बदलली… महिने बदलले… वर्ष बदलले… कर्णधार बदलला…संघाचे नावही बदलले…पण इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचे नशीब काही बदललं नाही. गेल्या 16 वर्षापासून दिग्गजांचा भरणा असणारा RCB चा संघ आयपीएलच्या ट्रॉफीपासून वंचित आहे. यंदाच्या हंगामातही संघाची आतापर्यंतची कामगिरी सुमारच राहिली आहे. आरसीबीने यंदा 5 सामन्यात 4 वेळा पराभवा सहन केला आहे. शनिवारी राजस्थानविरुद्ध झालेला सामनाही आरसीबीने 6 विकेट्ने गमावला.

राजस्थानविरुद्ध झालेल्या लढतीत विराट कोहलीने शतकी खेळी केली. यंदाच्या हंगामात विराटच्या बॅटमधून खोऱ्याने धावा निघाल्या आहेत. विराटने 5 लढतीत 146.29च्या स्ट्राईक रेटने आमि 105.33च्या सरासरीने 316 धावा चोपल्या आहेत. यात त्याच्या 2 अर्धशतकांचा आणि एका शतकाचा समावेश आहे. ऑरेंज कॅपही विराटच्याच डोक्यावर आहे. मात्र विराट व्यतिरिक्त आरबीसीचा एकही खेळाडू चमक दाखवू शकलेला नाही. विशेष म्हणजे पाचही सामन्यात ‘मागचे पाढे पंचावन्न’ दिसून आले. विराट कोहलीच्या संथ खेळीची चर्चा तर सोशल मीडियावर सुरू आहे, पण तो एकटाच आरसीबीचे ओझे वाहत असून इतर खेळाडूंची साथ त्याला मिळत नसल्याचे दिसतेय.

ग्लेन मॅक्सवेल –

ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याच्यासाठी आरसीबीने 11 कोटी मोजलेले असून यंदा त्याने 5 लढतीत फक्त 32 धावा केल्या आहेत. यादरम्यान तो दोनदा शून्यावर बाद झाला आहे. मॅक्सवेल एक-एक धाव काढण्यासाठी संघर्ष करताना दिसतोय. अर्थात फलंदाजीची थोडी कसर त्याने गोलंदाजीत काढण्याचा प्रयत्न केला असून 4 विकेट्स घेतल्या आहेत.

कॅमरून ग्रिन –

गतवर्षी मुंबई इंडियन्समध्ये असणाऱ्या ग्रिनला आरसीबीने 17.50 कोटी मोजून आपल्या संघात घेतले. ऑस्ट्रेलियाच्या या अष्टपैलू खेळाडूकडून आरसीबीला मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र ग्रिनने 5 लढतीत 68 धावा केल्या असून गोलंदाजीतही त्याला फक्त 2 विकेट्स मिळाल्या आहेत.

फाफ ड्यू प्लेसिस –

कोणत्या संघाच्या यशामध्ये कर्णधाराच्या कामगिरीची भूमिका महत्त्वाची असते. कर्णधारच
फ्लॉप होत असेल तर संघाचे टेन्शनही वाढते. आरसीबीमध्येही हिच परिस्थिती असून कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसला धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. 5 डावात त्याच्या बॅटमधून फक्त 109 धावा निघाल्या आहेत. आरसीबीने 2022च्या लिलावात त्याला 7 कोटी मोजून आपल्या ताफ्यात घेतले होते.

मोहम्मद सिराज –

आंतरराष्ट्रीय क्रिकेटचाही अनुभव पाठिशी असणारा मोहम्मद सिराज आरसीबीच्या वेगवान गोलंदाजीचा प्रमुख चेहरा आहे. मात्र त्याला 5 लढतीत फक्त 4 विकेट्स मिळाल्या आहेत. विरोधी संघाच्या फलंदाजांनी सिराजला 10.10च्या इकोनॉमीने चोपले आहे. सिराजसाठीही आरसीबीने 7 कोटी मोजले आहेत.

मयंक डागर –

फिरकीपटू मयंक डागर याचेही कामगिरी यथातथाच राहिली राहिली आहे. डागरला 5 लढतीत फक्त 1 विकेट मिळाली आहे. त्यालाही 10.14च्या इकोनॉमीने चोपण्यात आले आहे. मधल्या षटकांमध्ये धावा रोखून विकेट घेण्याची जबाबदारी फिरकीपटूंची असते. मात्र या दोन्ही कसोट्यांवर डागर अपयशी ठरताना दिसतोय. त्याच्यासाठी आरसीबीने 1.80 कोटी मोजलेले आहेत.