विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेत लिहिले ‘जय श्री राम’, पास करणे दोन प्राध्यापकांना भोवले

उत्तर प्रदेशातील जौनपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विद्यालयातील डी-फार्माच्या पहिल्या आणि दुसऱया सेमिस्टरच्या चार विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये प्रश्नांची उत्तरे लिहिण्याऐवजी जय श्री राम आणि काही क्रिकेटपटूंची नावे लिहिली होती. तरीसुद्धा या विद्यार्थ्यांना प्राध्यापकांनी उत्तीर्ण केले आहे. या विद्यार्थ्यांना प्रत्येकी 56 टक्के मार्क देऊन पास करण्यात आले. ही बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कुलगुरू वंदना सिंह यांनी या दोन्ही प्राध्यापकांवर कारवाई करत त्यांना पदमुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

वीर बहादूर सिंह पूर्वांचल विद्यालयातील एका माजी विद्यार्थ्याने माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली होती. अशा विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले आहे. याप्रकरणी दोन शिक्षक डॉ. विनय वर्मा आणि डॉ. आशुतोष गुप्ता यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. माजी विद्यार्थ्याला उपलब्ध करून देण्यात आलेल्या उत्तरपत्रिकांमधून धक्कादायक माहिती समोर आली. चार विद्यार्थ्यांनी आपल्या उत्तरपत्रिकांवर ‘जय श्रीराम, पास हो जाएं’ आणि विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांडय़ा अशा काही क्रिकेटपटूंची नावे लिहिली होती.

– माजी विद्यार्थी दिव्यांशू याने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. तक्रारीमध्ये सांगण्यात आले होते की, ‘प्राध्यापकांनी पैसे घेऊन विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले आहे.’

– विद्यालयातील दोन प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना 75 पैकी 42 मार्क दिले, म्हणजे त्यांना 56 टक्के मार्क्स देऊन उत्तीर्ण करण्यात आले.

– याप्रकरणी 21 डिसेंबर 2023 रोजी तपास करून कारवाईचे आदेश देण्यात आले होते. विद्यालयाने एक कमिटी स्थापन केली होती. तपासामधून धक्कादायक माहिती समोर आली. तपासामध्ये दोन प्राध्यापक दोषी आढळून आले.

– समितीने या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकनासाठी विद्यालयाबाहेरच्या शिक्षकांना दिल्या. त्यात विद्यार्थ्यांना शून्य मार्क मिळाले आहेत. कारण त्यांनी एकाचेही उत्तर लिहिले नव्हते. त्यामुळे माजी विद्यार्थ्याने केलेला दावा खरा ठरला आहे.