शरद पवार यांच्या भूमिकेवर शंका घेण्याचे कारण नाही; जयंत पाटील यांनी केले स्पष्ट

अजित पवार गटातील मंत्री आणि नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा होत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचे किंवा शंका घेण्याचे कारण नाही. शरद पवार त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्ष असून आमची विरोधकांची एकजूनट कायम आहे, असे जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

राजकारणात भेटीगाठी होतच असतात. कोणातरी कोणाल भेटल्यामुळे कोणीतरी कमजोर होतो, ही संकल्पनाच चुकीची आहे. लोकशाहीत सर्वांनी सर्वांशी संवाद साधण्याची गरज असते. संवादातून अनेक चांगल्या गोष्टी घडतात. संवाद बंद केल्याने नुकसान होते. कोणी येऊन भेटत असेल काही सूचना करत असतील, तर असा संवाद सुरु राहण्याची गरज आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.

सध्या पक्षात आणि विधिमंडळत जी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातून योग्य मार्ग काढावा, आम्हाला मार्गदर्शन करावे, अशी विनंती करण्यासाठी अजित पवार गटातील आमदारांनी शरद पवार यांची भेट घेतली. शरद पवार यांचे आशिर्वाद घेण्यासाठी हे आमदार आले होते, असे पाटील यांनी सांगितले. विधिमंडळात राष्ट्रवादी हा एकच पक्ष असल्याचे रेकॉर्डवर आहे. ज्या 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी पक्षाच्याविरोधी भूमिका घेतली आहे. त्यांना वगळून इतर आमदार हे राष्ट्रवादीचेच आहेत. त्यांनी कोणताही वेगळा गट स्थापन केलेला नाही, हे त्यांनीही मान्य केले आहे. त्यामुळे या परिस्थितीत मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम किंवा गोंधळ असण्याची शक्यता नाही. आम्ही भाजप सोबत जाणार नाही. आम्ही संघर्ष करणार, ही शरद पवार यांची भूमिका स्पष्ट आहे, असेही पाटील यांनी स्पष्ट केले. उद्या बंगळुरुमध्ये विरोधी पक्षांची बैठक होणार असून शरद पवार त्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.