कंगना-जावेद अख्तर प्रकरणात कंगनाविरोधात फौजदारी कारवाईचा मार्ग मोकळा

बॉलिवूडमधील ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी केलेल्या दाव्यांच्या आधारावर सुरु केलेल्या फौजदारी कारवाईला स्थगिती देण्याची अभिनेत्री कंगना राणौतची मागणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळून लावली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे कंगनाविरोधात फौजदारी कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूनंतर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत खोटी विधाने केल्याच्या आरोपाप्रकरणी ज्येष्ठ गीतकार यांनी अभिनेत्री कंगना राणौतविरोधात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला होता. त्याआधारे सुरू करण्यात आलेल्या फौजदारी कारवाईला स्थगिती देण्याची मागणी करीत कंगनाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्या याचिकेवर सविस्तर सुनावणी घेऊन 18 जानेवारीला न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवला होता. तो निर्णय न्या. प्रकाश नाईक यांच्या एकलपीठाने शुक्रवारी जाहीर केला.

अख्तर यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे खटल्याला आधीच सुरूवात झाली असून कंगनाने खूप उशिराने त्याविरोधात आक्षेप नोंदवला आहे. त्याआधीच फौजदारी कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे वास्तविकतेचा विचार करता प्रकरणाच्या या टप्प्यावर कंगनाने स्थगितीची केलेली मागणी मान्य करता येणार नाही, असे निरीक्षण न्या. नाईक यांनी कंगनाची याचिका फेटाळताना आदेशात नोंदवले.

अंधेरी न्यायदंडाधिकाऱ्यांनी सुरू केलेल्या फौजदारी कारवाईला विलंब फौजदारी कारवाईला विलंब करण्याच्या हेतुनेच कंगनाने याचिका केल्याचा दावा गीतकार जावेद अख्तर यांनी कंगनाच्या याचिकेला विरोध करताना अख्तर यांनी केला होता. कंगनाची याचिका आधारहीन असून गृहितकांवर आधारित आहे. तसेच, याचिकेतील उपस्थित मुद्दे अस्पष्ट आणि असमर्थनीय असून असल्याचा दावाही अख्तर यांनी केला होता.