कोल्हापूर मनपाच्या उद्यानांत करता येणार नववर्षाचा जल्लोष, सर्व उद्याने मध्यरात्री 12 पर्यंत खुली राहणार

निर्बंधमुक्त वातावरणात यंदा 2022 वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जिकडे तिकडे धूम सुरू आहे. पहाटेपर्यंत हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू राहणार आहेत; पण करवीरनिवासिनी श्री अंबाबाईसह सर्व मंदिरे नेहमीच्या वेळेनुसार सुरू राहणार आहेत. सलग सुट्टय़ांमुळे होणाऱ्या गर्दीवर नियंत्रणासाठी मंदिर प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे. दरम्यान, महापालिकेची उद्याने उद्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत खुली राहणार आहेत.

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या सेलिब्रेशनला गेली दोन वर्षे मर्यादा आल्या होत्या. मात्र, यंदा पहाटे पाचपर्यंत हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट उघडी ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे 2022 वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी कोल्हापूर जिल्हा सज्ज झाला आहे. त्यात सलग सुट्टय़ा असल्याने अगोदरच जिह्यातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, यात्री निवास, लॉजिंग आणि रिसॉर्टही फुल्ल झाली आहेत.

दरम्यान, अनेक पर्यटक आणि भाविक देवदर्शनाने नवीन वर्षाची सुरुवात करतात. त्यामुळे साडेतीन शक्तिपीठांपैकी एक संपूर्ण पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिरात दरवर्षी दर्शनासाठी उच्चांकी गर्दी असते. यंदाही नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर सर्व मंदिरे नेहमीप्रमाणे उघडणार असून, ठरलेल्या वेळेतच बंद होणार आहेत. श्री अंबाबाई मंदिर नेहमीप्रमाणेच पहाटे पाचच्या सुमारास उघडण्यात येणार असून, रात्री पावणेदहाच्या सुमारास बंद होणार आहे. मंदिरात परंपरेनुसार धार्मिक विधी व रिवाज होणार असल्याचे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी सांगितले. दख्खनचा राजा श्री जोतिबासह नृसिंहवाडी येथील श्री दत्तात्रय मंदिर आणि इतर सर्व मंदिर परंपरेनुसार उघडणार आहेत.

31 डिसेंबरचा जल्लोष तसेच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी शहरासह जिह्यात विविध ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नाकाबंदी करून रात्रीच्या वेळी वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. मद्यसाठा आणि शस्त्र्ाास्त्र्ाs येऊ नयेत यासाठी वाहनांची कसून तपासणी होत आहे. या कालावधीत ड्रंक ऍण्ड ड्राईव्हमुळे अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने यावर नियंत्रणासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.