Kokan News – आंबा घाटात करवंदे, जांभूळ विकून शिक्षणाचा खर्च भागविणारा युवक बनला महाराष्ट्र पोलीस..!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
आंबा घाटातील अतिदुर्गम अशा दख्खन धनगर वाडी पूर्व येथे अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेला आणि शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी आंबा घाटात करवंदे,जांभूळ विकणारा युवक अपार मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर महाराष्ट पोलिस बनला आहे.मंगेश सोमा फोंडे असे या तरुणाचे नाव असून एन टी सी  मधून त्याने जिल्ह्यात पहिल्या क्रमांकाचे गुण मिळविले आहेत.
मंगेश  ज्या वस्तीत जन्मला आजही त्या वस्तीवर वीज नाही. आई वडील शेतकरी आणि सोबतीला पशुपालन व्यवसाय असल्याने मिळणाऱ्या दुधाच्या पैशातून संसाराचा गाढा हाकला जायचा. जंगलात घर असल्याने आजूबाजूला असणाऱ्या करवंदाच्या जाळीतून करवंदे गोळा करायची आणि कुड्याच्या पानातून हायवेला विकायची. रस्त्याच्या दुतर्फा असणारी जांभळाची झाडावरील जांभळे काढून ती सुद्धा विकून मंगेश आईवडिलांना मदत करत करून आर्थिक हातभार लावत असे.
आंबा घाटात छोट्याशा टपरीत आंबा,फणस तसेच कणसे भाजून विकायचे काम सुध्दा मंगेशने केले आहे.चौथी पर्यंत दख्खन शाळेत शिक्षण घेतले.पाचवी ते बारावी साखरपा येथील वसतिगृहात राहून महात्मा गांधी विद्यालयात त्याने शिक्षण पूर्ण केले. तो  परिस्थिती पुढे झुकला नाही.त्याने  परिस्थितीवर मात करत आपले ध्येय अपार मेहनत आणि जिद्दीतून साध्य केले. मंगेश याच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.