Manipur Violence – मणिपुरात पुन्हा हिंसाचार, लोकगीते लिहिणाऱ्या प्रसिद्ध कलाकाराचा मृत्यू

मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार (Manipur Violence ) उसळला आहे. बिष्णुपूर-चुराचंदपूर सीमेवर (Bishnupur-Churachandpur border) बुधवारपासून हिंसाचाराला सुरुवात झाली असून या हिंसाचारात एका प्रसिद्ध लोकगीतकारासह 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या हिंसाचारात बंदुकांसह स्फोटके आणि बॉम्बचाही वापर करण्यात आला असल्याचे कळते आहे.

या हिंसाचारात मृत्यूमुखी पडलेल्या लोकगीतकाराचे नाव मांगबोई ल्हुगदीम( Mangboi Lhungdim ) असल्याचं कळतं आहे. कुकी जमातीच्या या गीतकाराने “आय गाम हिलोऊ हाम” (ही आमची भूमी नाही का?) हे गाणे लिहिले असून ते खूप प्रसिद्ध झाले आहे. मांगबोई हे स्फोटकांनी केलेल्या हल्ल्यात जखमी झाले होते त्यांना मिझोराममधील आयझॉलमधून बाहेर काढले जात असताना गुरुवारी पहाटे 1 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. खोइरेंटक-नरनसेना परिसरात झालेल्या गोळीबारात रिचर्ड हेमखोलून गुईटे (31) याचा मृत्यू झाला आहे. आयझॉलमार्गे गुवाहाटी येथे नेले जात असताना गुरुवारी सकाळी 9 वाजता त्याचा मृत्यू झाला.

पाओकम किपगेन आणि पौसौंडम वायपे या दोघांचा बिष्णुपूर-चुराचंदपूर सीमेवर झालेल्या हिंसाचारात मृत्यू झाला. चुरचंदपूर येथील खौसाबुंग गावात गोळीबारात आठ जण जखमी झाले. बिष्णुपूरमधील थमनापोकपी आणि नरनसेना या दोन गावांमध्ये पेबम देबन आणि मोईरांगथेम रोपेन या दोघांचाही मृत्यू झाला आहे.

हिंसाचार करणाऱ्यांनी इंफाळमध्ये दोन पडकी घरे जाळून टाकली. मोइरांगजवळील थमनापोकपी येथील वीज पुरवठा केंद्रातून होणारा वीजपुरवठाही दंगलखोरांनी खंडीत केला ज्यामुळे खोइरेंटक आणि खुसाबुंगमधील 10 हून अधिक गावातील बत्ती गुल झाली होती. सुरक्षादलांनी सांगितले की दंगलखोरांनी आपले लक्ष्ये शोधण्यासाठी ड्रोनचा वापर केला होता. लक्ष्य दिसताच त्यावर बॉम्बगोळ्यांचा मारा केला जात होता.

ज्या ठिकाणी हा हिंसाचार झाला आहे ती जागा नरनसेना येथील राखील दलाच्या तळाजवळ आहे. याच राखीव दला तळावरून दंगलखोरांनी 3 ऑगस्ट रोजी जवळपास 300 शस्त्रे लुटली होती. या शस्त्रांमध्ये तीन 51मिमी मोर्टार आणि 81 एचई मोर्टार बॉम्ब आहेत.