पाटण्यात भाजप मोर्चावर लाठीमार; पदाधिकाऱ्याचा मृत्यू

शिक्षक नियुक्ती, भ्रष्टाचार, बेरोजगारी अशा अनेक मुद्दय़ांवर मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत गुरुवारी भाजपा नेत्यांनी जेहानाबाद येथे काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीमार केला. या लाठीमारात भाजपाचे सरचिटणीस विजय कुमार सिंह यांचा मृत्यू झाल्याचा दावा भाजप नेत्यांनी केला. मात्र पोलिसांनी हा दावा फेटाळला आहे.

भाजपाचे राज्यसभा सदस्य सुशील कुमार मोदी यांनी ट्विटद्वारे विजय कुमार सिंह यांचा पोलिसांच्या लाठीमारात मृत्यू झाल्याचा दावा केला. मात्र त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नसल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. सरकारविरोधात विविध मुद्दय़ांरून गुरुवारी भाजप आमदारांनी विधानसभेत प्रचंड गदारोळ केला. सरकारविरोधात वेलमध्ये उतरून घोषणाबाजी केली. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी भाजपाच्या दोन आमदारांना बाहेर काढले. त्यानंतर भाजपा नेत्यांनी सरकारविरोधात मोर्चा काढला होता. डाकबंगला येथे पोलिसांनी भाजपा नेते आणि कार्यकर्त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र मोर्चा आक्रमक झाल्यामुळे त्यांच्यावर पाण्याचा मारा, अश्रुधुराच्या नळकांडय़ा फेकाव्या लागल्या तसेच लाठीचार्ज करावा लागल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. लाठीमारानंतर विजय कुमार सिंह यांना पाटणा वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असे ट्विट सुशील कुमार मोदी यांनी केले.

पोलिसांवर मिर्ची स्प्रेने हल्ला

भाजपा नेते आणि कार्यकर्ते आक्रमक झाल्यामुळे लाठीचार्ज करावा लागल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. तसेच भाजपा कार्यकर्त्यांनी पोलिसांवर दगडफेक आणि मिर्ची स्प्रेने हल्ला केल्याचा दावाही पोलिसांनी केला आहे.

पोलिसांचा दावा काय?

विजय कुमार सिंह हे रस्त्याच्या कडेला बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांच्या शरीरावर कुठेही लाठीमार झाल्याच्या खुणा नाहीत. त्यांना तातडीने पाटना वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, असा दावा पोलिसांनी केला आहे.