लिव्हिंगस्टोनचा अफलातून खेळ; इंग्लंडची मालिकेत बरोबरी

अर्धा संघ 55 धावांत गारद झाल्यानंतर लियाम लिव्हिंगस्टोनच्या 78 चेंडूंतील नाबाद 95 धावांच्या झंझावाती खेळीच्या जोरावर इंग्लंडने 34 षटकांत 7 बाद 227 अशी दमदार मजल मारली आणि न्यूझीलंडचा डाव 147 धावांत गुंडाळून चार वनडे सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

इंग्लंडने 34 षटकांत ठेवलेले 228 धावांचे आव्हान न्यूझीलंडला पेलवलेच नाही. इंग्लंडच्या डेव्हिड विली आणि रीक टॉपले यांनी प्रत्येकी तीन-तीन विकेट घेत न्यूझीलंडचा डाव 26.5 षटकांतच संपुष्टात आणला. न्यूझीलंडकडून डॅरिल मिचेलने 57 धावांची सर्वोत्तम खेळी केली. त्याआधी इंग्लंडच्या डावाला आठ चेंडूंत ट्रेंट बोल्टने तीन हादरे देत 3 बाद 8 अशी दुर्दशा केली होती. त्यानंतर इंग्लंडचा डाव सावरला नाही आणि त्यांचा अर्धा संघ 55 धावांत आटोपला. मात्र त्यानंतर सातव्या क्रमांकावर आलेल्या लियाम लिव्हिंगस्टोनने अद्भुत फलंदाजी करताना मोईन अलीबरोबर (33) सहाव्या विकेटसाठी 48 आणि सॅम करनसह (42) सातव्या विकेटसाठी 112 धावांची भागी रचत संघाला 227 धावांपर्यंत मजल मारून दिली.