मोदी कालखंड देशहिताचा ठरला नाही! शरद पवार यांचा हल्लाबोल

‘देशात आज मोठय़ा प्रमाणावर राजकीय अराजकता माजली असून, मोदी कालखंड हा देशहिताचा ठरला नसल्याने देशाची सत्ता पुन्हा मागण्याचा नैतिक अधिकार मोदींना नाही,’ असा जबरदस्त हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पाटण येथील प्रचंड जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केला.

महाविकास आघाडीचे सातारा मतदारसंघाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेस माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर, उमेदवार आमदार शशिकांत शिंदे, आमदार अरुण लाड, सत्यजीतसिंह पाटणकर, सारंग पाटील, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम, श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, हिंदूराव पाटील, दीपक पवार, राजेंद्र पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

शरद पवार म्हणाले, ‘यशवंतरावांचे विचार जोपासणे आव्हानात्मक आहे. एक सर्वसामान्य म्हणून आम्ही ते आव्हान आतापर्यंत जोपासत आलो आहोत. सध्याचे राज्यातील अथवा केंद्रातील सरकार हे मतलबी व अराजकता माजविणारे आहे. ही निवडणूक प्रामुख्याने प्रचंड महागाई, बेरोजगारी, जातीयवाद या प्रमुख मुद्दय़ांवर होत असल्याने याचा सर्वसामान्य मतदारांनी गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे.’

ते पदाची गरिमा राखू शकले नाहीत

n ‘सन 2014च्या तुलनेत आज प्रचंड महागाई वाढली आहे. आजच्या या महागाईत महिला घर, तर सर्वसामान्य जनता वाहने चालवू शकत नाहीत. देशातील 87 टक्के तरुण बेरोजगार आहेत. जातीयवाद, धार्मिकता यावरच आज हा देश चालविला जात आहे. पंतप्रधान मोदी हे गांधी घराणे, नेहरू आणि राहुल गांधी यांच्यावर टीकाटिप्पणी करण्यात मश्गूल आहेत. ज्या माणसांनी व कुटुंबाने आपल्या स्वातंत्र्यात महत्त्वाची भूमिका बजाविली, त्यांच्यावरच टीका, टिंगलटवाळी करणे हे या देशातील जनतेला कधीही मान्य होणार नाही. विद्यमान पंतप्रधान त्या पदाची गरिमा राखू शकले नाहीत. त्यामुळे यापुढे देश नक्की कोणाच्या हातात द्यायचा, हे येणारी लोकसभा निवडणूक ठरवणार असल्याने निश्चितच सातारा जिल्हाच नव्हे, तर राज्य व देशातही परिवर्तन अपेक्षित आहे. या अपेक्षित परिवर्तनामध्ये शशिकांत शिंदे यांच्यासारख्या एका अभ्यासू, परखड व्यक्तिमत्त्वाला आपण संसदेत बहुमताने पाठवा,’ असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

महाराष्ट्र अन्याय सहन करत नाही; हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही

n ‘महाविकास आघाडीचे सातारचे उमेदवार शशिकांत शिंदे हे कामगार नेते आहेत. लोकप्रिय व्यक्तिमत्त्व आहेत. काही ना काही करून त्यांना अडवायचे कसे? या निवडणुकीत त्यांना थांबवायचे कसे? याचे सूत्र यांच्या डोक्यात आहे. त्यामुळेच त्यांच्यावर गुन्हा नोंदविला आहे. शशिकांत शिंदे यांना त्यांनी अटक केल्यास त्याविरोधात आम्ही सातारा जिह्यातच नव्हे, तर राज्यातील तालुक्या-तालुक्यात लोकशाहीच्या मार्गाने संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही. हा अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करीत नाही, हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा शरद पवार यांनी दहिवडी येथील जाहीर सभेत बोलताना दिला.

काहींना निवडणूक काळात यशवंतरावांची आठवण!

n ‘सातारा जिल्हाच नव्हे, तर महाराष्ट्राला स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची परंपरा असून, आता निवडणूककाळात काहींना यशवंतराव चव्हाण यांना ‘भारतरत्न’ देण्याची आठवण होतेय, ही आनंदाची बाब आहे,’ अशी खोचक टीका शरद पवार यांनी केली. ‘स्व. यशवंतरावांचे विचार व परंपरा जोपासायची असेल, तर या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनाच संसदेत पाठवा,’ असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

सर्वसामान्य मतदारांमध्ये भाजपविरोधात प्रचंड चीड – पृथ्वीराज चव्हाण

n आमदार पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘सध्या राज्यात पक्ष फोडणे, खोकी, ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा दबाव व आमिष दाखविण्यापलीकडे काहीच घडत नाही. सत्ताधाऱयांनी भलेही आमदार, नेते फोडले असले, तरी सर्वसामान्य मतदारांमध्ये भाजपविरोधात प्रचंड चीड बाळगून आहेत. आता राज्यघटना बदलण्याची हिंमत करणाऱया व लोकशाहीसाठी घातक असलेल्या विघातक वृत्तींविरुद्ध ही निवडणूक होत असल्यामुळे तुम्ही-आम्ही बेसावध न राहता जबाबदारीने चांगल्या खासदारांना विजयी करण्यासाठी सर्वस्व समर्पित करणे गरजेचे आहे. सध्याचे पालकमंत्री आपल्या पदाचा गैरवापर करीत असून, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या अनैतिक सरकारविरोधात आपल्याला लढायचे असेल, तर पाटण मतदारसंघातून प्रचंड अपेक्षा आहेत. महाराष्ट्रात जे नाटय़मय राजकारण सुरू आहे, ते केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्याच आशीर्वादाने होत असल्याने आता गद्दारांना धडा शिकविण्यासाठी शशिकांत शिंदे यांच्यासारख्या प्रामाणिक माणसाला निवडून देणे हिताचे ठरणार आहे. या निवडणुकीच्या निकालात गद्दारांना त्यांची जागा दाखविण्याची खरी जबाबदारी सर्वसामान्य मतदारांच्या हातात आहे,’ असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

जीव गेला तरी साथ सोडणार नाही – शिंदे

n ‘निष्ठावंत कसा असावा, हे आजवर विक्रमसिंह पाटणकरांनी, तर शेलारमामा कसा असावा, हे श्रीनिवास पाटील यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या याच तालुक्यात सत्ताधारी राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड जनतेचा रोष आहे. त्यामुळे नव्याने क्रांती करायची असेल, तर माझ्यासारख्या सामान्य माथाडी व पवारसाहेबांशी एकनिष्ठ असलेल्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी आपण सर्वजण प्रामाणिकपणे प्रयत्न कराल,’ असा विश्वास शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. ‘माझ्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून जाणीवपूर्वक कारवाया केल्या जात आहेत. मात्र, जीव गेला तरी चालेल, मी पवारसाहेबांची साथ कधीही सोडणार नाही,’ असेही ते म्हणाले.