
मुंबईतील कुठलेही मैदान ढापण्याचा प्रयत्न झाला तर तो हाणून पाडा, कुणी पत्रेबित्रे लावायला आले तर त्यांना चोख उत्तर द्या, असे निर्देश शिवसेना नेते, युवासेना प्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज शिवसैनिक आणि युवासैनिकांना दिले. आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी जुहू बीचसह तेथील लोकमान्य टिळक उद्यानाची पाहणी केली. भारतीय जनता पक्षाचे सरकार हे साडेचार एकरचे मैदानही ढापायला निघाले आहे. त्याला शिवसेनेने तीव्र विरोध केला आहे. आदित्य ठाकरे यांनी या मैदानाच्या पाहणीनंतर तिथेच पत्रकार परिषद घेऊन यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी शिवसेना आमदार हारून खान, अंधेरी पश्चिम विधानसभा संघटक संजय मानाजी कदम आदी उपस्थित होते.
मुंबईतील 16 एकर जागा सरकार एका ट्रस्टला देत आहे. वांद्र्याचे नेव्हील डिसोझा मैदान दिले जातेय आणि मुलुंड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचा भूखंड पेट्रोल पंपासाठी दिला जातोय. भाजपचे सरकार आणि मुख्यमंत्री फडणवीस मुंबईतील मोकळी मैदाने त्यांच्या मित्रांना व आमदारांना आशीर्वाद म्हणून भेट देत आहेत, आता तर छत्रपती शिवाजी महाराज पार्कही एमसीए मागायला निघालेय, असा जोरदार हल्ला चढवतानाच, भाजप राजवट मुंबईतील एक तरी मैदान शिल्लक ठेवणार आहे का, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला.
मैदान लोकांसाठीच राहील आणि शिवसेना ते राखेल
भाजप मोकळी मैदाने आमदारांच्या खिशात, बिल्डर, कंत्राटदारांच्या घशात घालत आहे. लोकमान्य टिळक मैदान हे मातीचे मैदान आहे. इथे 50 कोटी टाकू असे जे सांगताहेत त्यांनी सीएसआरमधून हे मैदान चांगले करून द्यावे, 50 कोटी द्यायचेत तर पालिकेला मोकळ्या मैदानांसाठी द्या. हे मैदान लोकांसाठीच राहील आणि शिवसेना ते लोकांसाठी राखेल, असा शब्दही आदित्य ठाकरे यांनी दिला.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्री तरुणांना सांगतात, स्क्रीनवर राहू नका, मैदानात उतरा. पण तेच मुंबईतील मोकळी मैदाने मित्रांच्या घशात टाकत असतील तर तरुणांनी, मुलांनी कोणत्या मैदानावर उतरायचे. मोकळ्या मैदानांचे खासगीकरण झाले तर सर्वसामान्यांसाठी ती बंद होतील. मैदाने आणि मोकळे भूखंड बळकावण्यास शिवसेना तीव्र विरोध करेल.
आदित्य ठाकरे, युवसेना प्रमुख
























































