
काही ठिकाणी अवर्षण तर काही ठिकाणी अवकाळी आणि अतिवृष्टीमुळे राज्याच्या विविध भागांतील शेतकरी आधीच हैराण झाला असताना या वर्षी सरासरीपेक्षा कमी म्हणजे 92 टक्केच पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली असून राज्यात पाण्याच्या तुटवड्याचा प्रश्न निर्माण होण्याची भीती आहे.
हवामान विभागाने आज या वर्षी पडणाऱया पावसाचा अंदाज व्यक्त केला. जेव्हा 90 किंवा 95 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असतो तेव्हा सामान्यापेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येतो. त्यानुसारच भारतीय हवामान विभागाने आज नैऋत्य मान्सून 2026चा पहिला अधिपृत अंदाज जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रात कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ सगळीकडे सामान्यापेक्षा कमी पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाचे महासंचालक डॉ. एम. मोहापात्रा यांनी दिली आहे.
एल निनो वादळ स्थितीचा फटका
जून, जुलै, ऑगस्टपर्यंत पावसाची स्थिती सामान्य राहणार आहे. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात एल निनो वादळ स्थिती परिस्थिती राहणार आहे. तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये भारतीय समुद्रात सकारात्मक परिस्थिती आहे. त्यामुळे एल निनोच्या नकारात्मक परिणामाला समुद्रातील परिस्थिती अनुकूल करेल.
…म्हणजेच सरासरीपेक्षा कमी पाऊस
हवामान विभागाने पाऊस मोजण्याच्या पाच श्रेणी ठरवल्या आहेत. सरासरीच्या 90 टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे अपुरा पाऊस समजला जातो.
दुसऱ्या श्रेणीत 90 ते 95 टक्के म्हणजे सरासरीपेक्षा कमी पाऊस, तर तिसऱया श्रेणीत 96 ते 104 टक्के म्हणजे सामान्य सरासरीइतका पाऊस समजला जातो.
पुढील दोन श्रेणी सरासरीपेक्षा अधिक म्हणजे 105 ते 110 टक्के आणि 110 टक्क्यांच्या पुढे अधिक पाऊस म्हणजे सर्वाधिक पाऊस समजला जातो.



























































