मलाही मोदींबद्दल माहिती आहे, त्यांनीही कुठे कुटुंब सांभाळले? शरद पवार यांचा पलटवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये शरद पवारांवर त्यांच्या कुटुंबावरून टीका केली होती. मोदींच्या या टीकेला शरद पवार यांनी प्रत्युत्तर देत मोदींवर पलटवार केला आहे. पवार या वयात स्वतःचे कुटुंब सांभाळू शकले नाहीत, ते महाराष्ट्र काय सांभाळणार, असे मोदी म्हणाले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले की, मलाही मोदींबद्दल माहिती आहे. त्यांनीही कुठे कुटुंब सांभाळले? पण मी त्याबाबत बोलणार नाही. त्यांची कौटुंबिक परिस्थिती अतिशय चिंताजनक आहे. असे कोणाबाबतही व्यक्तिगत बोलू नये. हे पथ्य पंतप्रधानांनी पाळले नाही. पण आपण ते पाळणार आहोत, असे सांगत शरद पवार यांनी मोदींना जबरदस्त प्रत्युत्तर दिले आहे.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या धोरणांवर मोदींनी टीका-टिप्पणी केली होती. पण त्या काळात घेतलेले निर्णयच मोदी राबवत आहेत. त्यांचातला हा विरोधाभास लोकांना दिसत आहे. मोदी यांनी 10 वर्षात काय केले, ते सांगत नाही. त्यांचा वेळ विरोधकांवर टिकाटिप्पणी करण्यातच जातो. जनताही आता डॉ. मनमोहन सिंग यांची दहा वर्ष आणि मोदींच्या दहा वर्षांच्या कार्यकाळाची तुलना करत आहेत. मोदींनी केलेली फसवणूक आता जनतेच्या लक्षात येत आहे, असेही शरद पवार म्हणाले.

पंतप्रधान मोदी यांनी अनेक आश्वासने दिली होती. त्यापैकी कोणतेही पूर्ण केलेले नाही. जनतेला आश्वासन देण्यापूर्वी सरकारला ते करणे झेपेल की नाही, याचा विचारही ते करत नाहीत. त्यामुळे ते फक्त आश्वासने देतात. त्याच्या अंमलबाजावणीकडे आणि पूर्ततेकडे त्यांचे लक्ष नसते. म्हणून मोदींबद्दलची जनतेची आस्था कमी होत आहे, असेही शरद पवार म्हणाले.