शिंदे गटातील धुसफूस उघड; अब्दुल सत्तार यांचा पक्षातील नेत्यांवरच निशाणा

गेल्या काही दिवसांपासून कृषिमंत्री अब्दुल सत्तार अडचणीत आले आहे. त्यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहेत. या सर्व घडामोडींबाबत बोलताना अब्दुल सत्तार यांनी पक्षातील नेत्यांवर हल्ला चढवला आहे. त्यांच्या विधानाने शिंदे गटातील धुसफूस उघड झाली आहे. माझ्याच पक्षातील नेते माझ्याविरोधात कट रचत असल्याचा आरोप सत्तार यांनी केला आहे. अब्दुल सत्तार यांच्या या विधानाने राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. तसेच शिंदे गटातील अतर्गंत वाद आणि कुरघोड्या उघड झाल्या आहेत. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सत्तार बोलत होते.

टीईटी घोटाळा, सिल्लोड येथील कृषीमहोत्सव आणि वाशीम येथील गायरान जमिनीवरून अब्दुल सत्तार यांच्यावर आरोप होत आहे. याबाबत सत्तार यांनी मौन सोडले आहेत. मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यात काही माझ्या पक्षातील असू शकतात तर काही माझे हितचिंतक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. त्यामुळे आमच्यातील कोणीतरी बाहेर बातम्या पुरवत असल्याचा आरोपही सत्तार यांनी केला आहे. तर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्याकडून हे सर्व सुरु असल्याचे सत्तार म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले की, माझ्यावर झालेल्या सर्व आरोपाचे खुलासे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला आहे. मी राज्यमंत्री नसतानाही त्या काळातील आरोप माझ्यावर करण्यात आले. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझ्या पक्षातील काही लोकं यात असू शकतात. तर विरोधी पक्षात देखील माझे अनेक हितचिंतक आहेत. माझ्यासारखा अल्पसंख्याक व्यक्ती कृषिमंत्री पदावर बसल्याने अनेकांना पाहिले जात नाही. त्यामुळे सतत माझ्याविरोधात कट कारस्थान रचले जात असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले की, आमच्या पक्षाच्या बैठकीमधील बातम्या बाहेर येत आहे. मागे आमची मुख्यमंत्री यांच्यासोबत एक बैठक झाली होती. त्या बैठकीत काय झाले हे बाहेर आले. विशेष म्हणजे ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या देखील बाहेर सांगण्यात आले. त्यामुळे आपल्यातील कुणीतरी आपल्यातील खाजगी गोष्टी बाहेर पुरवत असल्याचं मी मुख्यमंत्री यांच्या कानावर घातले असून, याबाबत चौकशी करण्याची मागणी देखील केली असल्याचं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत.

मी एक छोटा कार्यकर्ता आहे, मात्र यांनी संपूर्ण महाराष्ट्राला गिळलं असून यांच्या चौकशा झाल्या तर भुई पळता थोडी होईल, असे सत्तार म्हणाले. मुख्यमंत्र्यांकडे सर्वांचा डेटा जमा आहे. मुख्यमंत्री सभागृहात बोलले आहेत. मी तर आधीच टीईटीमध्ये एका कागदाचाही फायदा घेतला असेल तर फासावर लटकवा म्हटलं आहे. जोपर्यंत देव माझ्यासह आहे तोपर्यंत काही होणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तुमच्याविरोधातील कटात कोण सहभागी आहे असं विचारलं असता ते म्हणाले, आमच्या पक्षातील असतील, काही हितचिंतक असतील किंवा विरोधी पक्षात ज्यांच्या खूर्च्या रिकाम्या झाल्या तेही असू शकतात, असे ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांच्या घरात झालेली चर्चा बाहेर येत असल्याचं सांगत त्यांनी नाराजी जाहीर केली. आम्ही मुख्यमंत्र्यांच्या घरात चर्चा करत होतो. ती चर्चा बाहेर आली तेव्हा मी त्यांना चुकीच्या बातम्या बाहेर येत असल्याचं सांगितलं. मी कोणाचंही नाव घेतलं नाही. त्याचा तपास मुख्यमंत्री करणार आहेत. त्यांच्याकडे मी तक्रार केली आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. विरोधी पक्षात माझे फार हितचिंतक आहेत. माझ्यासारख्या अल्पसंख्यांक समाजाच्या माणसाला इतकं महत्वपूर्ण खातं कसं दिलं याबद्दल काही लोकांच्या मनात खदखद आहे. पण ते त्याचं काम करतात मी माझं काम करतो, असे सत्तार यांनी सांगितलं.

अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विधानानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिंदे गटातील काही लोकं आपल्याविरोधात कट रचत असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला आहे. त्यामुळे शिंदे गटात अंतर्गत धुसफूस असल्याचे समोर आले आहे. तसेच शिंदे गटात सर्वकाही आलबेल नसल्याचेही दिसून येत आहे.