घराबरोबरच इतर सोयीसुविधाही निश्चित वेळेत देणे बंधनकारकच; टाळाटाळ करणाऱया विकासकांना महारेराचा दणका

गृहनिर्माण प्रकल्प पूर्ण कधी होणार याची निश्चित माहिती देणे बंधनकारक केले असताना आता घराबरोबर येणाऱया इतर सर्व सोयीसुविधाही निश्चित वेळेत देणे विक्री कराराचा भाग (अँग्रिमेंट ऑफ सेल) म्हणून बंधनकारक आहे, असे आदेश महारेराने विकासकांना दिले आहेत. त्यामुळे घराबरोबर इतर सुविधा निश्चित वेळेत देण्यास टाळाटाळ करणाऱया विकासकांच्या मनमानीला आळा बसणार आहे.

गृहनिर्माण प्रकल्पात काही विकासकांकडून ग्राहकांची वेगवेगळ्या प्रकारे फसवणूक करण्यात येते. याला आळा घालण्यासाठी आणि ग्राहकांचे हित जपण्यासाठी महारेराकडून वेळोवेळी मार्गदर्शक सूचना आणि आदेश काढून ग्राहकांना दिलासा दिला जातो.

 आदर्श विक्री करारात अनुसूची दोनमध्ये आतापर्यंत सुविधा आणि सुखसोयींचा फक्त उल्लेख होता. आता या प्रस्तावित आदेशात दिल्याप्रमाणे प्रत्यक्षात आश्वासित सुविधा आणि सुखसोयी कधी उपलब्ध होणार यांचा तपशील देणे बंधनकारक आहे.
 निश्चित तारखेबरोबरच ही तरतूदही पार्ंकगप्रमाणेच अपरिवर्तनीय (नॉन निगोशिएबल) आहे.
 प्रमाणित विक्री करारातील दैवी आपत्ती, दोषदायित्व कालावधी, चटई क्षेत्र, हस्तांतरण आणि नव्याने समाविष्ट केलेल्या पार्ंकगनंतर आता इतर सोयीसुविधाही अपरिवर्तनीय करण्यात आल्या आहेत.

या सोयीसुविधा मिळताना होणार फायदा

तरणतलाव, बॅडमिंटन कोर्ट, टेनिस कोर्ट, टेबल टेनिस कोर्ट, नाटय़गृह, सोसायटी कार्यालय, व्यायामशाळा, स्क्वॅश कोर्ट अशा प्रकारच्या आश्वासित सर्व सुविधा, सुखसोयी इमारतीतील रहिवाशी आणि त्यांचे कुटुंबीय यांना वापरासाठी कधी उपलब्ध होणार, त्याचा आकार काय राहील, याचाही तपशील तारखेसह देणे आता बंधनकारक राहणार आहे.

विकासकांच्या मनमानीला बसणार आळा

घर विक्री करारात गृहनिर्माण प्रकल्पाच्या सार्वजनिक क्षेत्रात, इमारतीत, इमारतीच्या सार्वजनिक क्षेत्रात आणि प्रकल्पाच्या एकूण रेखांकित क्षेत्रात द्यायच्या आश्वासित सर्व सुविधा, सुखसोयी इमारतीतील रहिवाशी आणि त्यांचे कुटुंबीय यांना वापरासाठी कधी उपलब्ध होणार, त्याचा आकार काय राहील, याचा कुठलाही तपशील नसतो. अपवादाने असलाच तर या सुविधा उपलब्ध होणार याचा तपशील नसतो. त्यामुळे अनेकदा सदनिका नोंदणी करताना आश्वासित सुविधा, सुखसोयी राहायला गेल्यानंतर आश्वासनानुसार वेळेवर उपलब्ध होत नाहीत. मात्र महारेराच्या नव्या आदेशामुळे विकासकांच्या मनमानीला आळा बसणार आहे.