म्हाडा वर्षभरात मुंबईत 2538 घरे बांधणार, 17 हजार 430 कोटींचा अर्थसंकल्प… राज्यात 13 हजार घरांचे टार्गेट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

म्हाडाच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या आर्थिक वर्षात म्हाडा राज्यात सुमारे 13012 घरे उभारणार आहे. म्हाडाच्या मुंबई, पुणे, कोकण, नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर या प्रादेशिक मंडळांमार्फत ही घरे उभारण्यात येणार असून घरांच्या बांधकामासाठी 2026-27च्या अर्थसंकल्पात तब्बल 10 हजार 585 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुंबईत येत्या आर्थिक वर्षात विविध उत्पन्न गटातील 2538 घरांची उभारणी करण्यात येणार असून त्यासाठी 6747 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

दिवसेंदिवस जागेचे भाव आणि बांधकाम खर्च वाढल्यामुळे बिल्डरांची घरे विकत घेणे सर्वसामान्यांना परवडत नाही. स्वस्तात हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक जण म्हाडाच्या लॉटरीची आतुरतेने वाट पाहत असतात. म्हाडाचा 2025-26 या वित्तीय वर्षाकरिता सुधारित व 2026-2027चा अर्थसंकल्प प्राधिकरणास नुकताच सादर करण्यात आला. प्राधिकरणाच्या 2025-2026 या वित्तीय वर्षाकरिता 12399.22 कोटी रुपयांच्या सुधारित व 2026-27च्या 17430.73 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाची नुकतीच मंजुरी मिळाली आहे.

कुठे, किती घरे उभारणार

  • मंडळ प्रस्तावित घरे निधी
  • कोकण 5112 1497.64 कोटी
  • पुणे 665 664 कोटी
  • नागपूर 2008 1206.19 कोटी
  • छत्रपती संभाजीनगर 1483 258.32 कोटी
  • नाशिक 237 151.57 कोटी
  • अमरावती 969 59.98 कोटी

सेस इमारती, संक्रमण गाळ्यांच्या दुरुस्तीसाठी 661 कोटी

मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळा अंतर्गत उपकरप्राप्त इमारतींच्या दुरुस्तीसाठी तसेच पीएमजीपी, संक्रमण गाळे व पुनर्रचित इमारतींच्या दुरुस्ती व देखभालीकरिता अर्थसंकल्पात 661.73 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळातर्फे आमदार निधी, शासन निधीतून करण्यात येणाऱया कामांसाठी 2026-27च्या अर्थसंकल्पात 2711.95 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.