मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; गोळीबारात 2 ठार, 50 जखमी

मणिपूरमध्ये हिंसाचार पुन्हा उफाळला असून, तेंग्नोपाल जिल्ह्यातील पाल्लेल येथे शनिवारी झालेल्या गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये दोन जण ठार झाले आणि 50 जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, राज्यातील पाच जिल्ह्यांतील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे.

जखमींपैकी चार नागरिकांना गोळ्या लागल्या आहेत. पाल्लेल येथे सकाळी सहाच्या सुमारास दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात एकजण ठार झाला. या गोळीबारात जखमी झालेल्या व्यक्तींना इम्फाळ येथे उपचारासाठी पाठवण्यात आले असून, एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

परस्परांवर गोळीबार करणाऱ्या या दोन्ही गटांकडे लुटलेली शस्त्रास्त्रे होती. गोळीबाराचे वृत्त पसरताच, थोबल आणि काकचिंग जिह्यातील लोकांनी मोठय़ा संख्येने पाल्लेलकडे धाव घेतली. मात्र, त्यांना आसाम रायफल्सच्या जवानांनी वाटेतच रोखले. या जमावाला पांगवण्यासाठी जवानांनी अश्रुधुराचा उपयोग केला असता झालेल्या पळापळीत 45 हून अधिक महिला जखमी झाल्या. येथेही एक व्यक्ती ठार झाली.

पाल्लेल येथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी निघालेल्या आसाम रायफलच्या एका तुकडीला थोबल येथे स्थानिकांनी अडवून धरले होते. तेथे अद्याप तणाव आहे.