मणिपूर हिंसाचार: उखरुलमध्ये सशस्त्र हल्लेखोरांसोबत झालेल्या गोळीबारात 3 ठार

manipur

मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यात आज पहाटे झालेल्या पुन्हा हिंसाचार उसलळा. यामध्ये तीन जण ठार झाल्याचं वृत्त आहे. पहाटेच्यावेळी सशस्त्र हल्लेखोरांसोबत झालेल्या गोळीबारात हे तीन जण ठार झाल्याचं सांगण्यात आलं आलं आहे.

मणिपूरच्या उखरुल जिल्ह्यातील थोवाई कुकी गावात गोळीबार झाला. यामध्ये तीन गावकऱ्यांचा मृत्यू झाला, असं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी गावातून बराचवेळ गोळीबाराचे आवाज ऐकू आले. काही वेळानंतर तीन जण बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. गावकऱ्यांनी या तिघांचा शोध सुरू केला आणि नंतर त्यांचे मृतदेह सापडले.

जामखोगिन हाओकिप (26), थांगखोकाई हाओकिप (35) आणि हॉलेनसन बाईट (24) अशी मृतांची नावं आहेत.

हिंसाग्रस्त मणिपूरमधील ही घटना ताजी आहे. 3 मे रोजी मेतई समुदायाला अनुसूचित जमातीचा दर्जा मिळावा या मागणीला विरोध करण्यासाठी पर्वतीय जिल्ह्यांमध्ये ‘आदिवासी एकता मार्च’ आयोजित केल्यानंतर मोठ्या वांशिक संघर्षाला सुरुवात झाली.

हिंसाचार सुरू झाल्यापासून आतापर्यंत 120 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 3,000 हून अधिक जखमी झाले आहेत. तसेच मोठ्याप्रमाणात लोकांना विस्थापित करण्यात आलं आहे.

मणिपूर पोलिसांव्यतिरिक्त सुमारे 40,000 केंद्रीय सुरक्षा कर्मचारी हिंसाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि राज्यात पुन्हा एकदा शांतता नांदावी यासाठी तैनात करण्यात आले आहेत.