मणिपुरात पुन्हा धुमश्चक्री हवेत गोळीबार, 21 महिला जखमी

मणिपूरमध्ये मैतेई आणि कुकी समाजात उसळलेल्या हिंसाचाराला आज 3 ऑगस्ट रोजी तीन महिने पूर्ण झाले आहेत. बिष्णुपूर जिह्यात गुरुवारी सुरक्षा दल आणि मैतेई समाज यांच्यात धुमश्चक्री पाहायला मिळाली. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सुरक्षा दलाला अश्रुधुराच्या नळकांडय़ा फोडाव्या लागल्या तसेच हवेत गोळीबार करावा लागला. यात 21 महिला जखमी झाल्या आहेत.

बिष्णुपूरमध्ये मैतेई समाजाच्या महिलांनी बफर झोन पार करण्याचा प्रयत्न केला. आसाम रायफल्सने त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. संतप्त झालेल्या महिलांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी अश्रुधुराच्या नळकांडय़ा पह्डल्या, हवेत गोळीबार केला. मणिपूर हिंसाचारात आतापर्यंत 160हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह चुराचंदपूर येथील हॉस्पिटलमधील शीतशवगृहात ठेवले आहेत.

न्यायाधीशांची कार पेटवली

हल्लेखोरांनी अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांची कार पेटवून दिली. यावेळी त्यांची तीन वर्षाची मुलगी सुद्धा सोबत होती. न्यायाधीशांनी अरुंद काचेतून बाहेर पडून जीव वाचवला.

मृतदेहांना बाहेर दफन करण्याची अफवा

काही कुकी लोकांचे मृतदेह बाहेर दफन करण्यासाठी घेऊन जाणार आहेत, अशी अफवा पसरल्याने मोठा जमाव जमा झाला.

सामूहिक दफन विधी जैसे थे ठेवा – उच्च न्यायालय

गुरुवारी चुराचंदपूरमधील कुकी समाजाच्या 35 मृतदेहांवर सामूहिक दफन विधी करण्यात येणार होता. परंतु गृह मंत्रालयाच्या चर्चेनंतर हा निर्णय टाळण्यात आला. मणिपूर उच्च न्यायालयाने यावर आज सकाळी सुनावणी केली. या सुनावणीत सामूहिक दफन विधी जैसे थे ठेवण्याचे निर्देश दिले.