इंग्लंडचा मास्टरस्टोक्स; जगज्जेतेपद राखण्यासाठी निवृत्त बेन स्टोक्स परतला

अखेर इंग्लंड आयसीसी वन डे वर्ल्ड कपला 50 दिवस उरले असताना आपला मास्टरस्ट्रोक खेळला. वर्षभरापूर्वी वन डेतून निवृत्ती पत्करलेल्या धडाकेबाज आणि झुंजार बेन स्टोक्सला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यात इंग्लंडने यश मिळविले असून त्यांचे जगज्जेतेपद राखण्यासाठी तो पुन्हा एकदा वन डे संघात परतला आहे. इंग्लंडने आज आपला संभाव्य संघ जाहीर करताना स्टोक्ससह गस अॅटकिन्सनची आश्चर्यकारक निवड केली आहे. अनफिट असलेल्या जोफ्रो आर्चरऐवजी अॅटकिन्सनचे नाव पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. हाच संभाव्य संघ आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या चार वन डे आणि चार टी-20 सामन्यांच्या मालिकेत खेळणार आहे.

इंग्लंडच्या वर्ल्ड कप संघाविषयी…
– बेन स्टोक्सच्या समावेशामुळे इंग्लंडची ताकद वाढली.
– जोफ्रा आर्चरची दुखापत लवकर बरी होण्याची शक्यता कमी असल्यामुळे अॅटकिन्सनला संघात स्थान.
– आर्चरने आपले फिटनेस सिद्ध केल्यास तोसुद्धा हिंदुस्थानचा दौरा करू शकतो.
– अॅटकिन्सन हा एकमेव खेळाडू जो अद्याप एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही.
– बटलर हा अॅटकिन्सनच्या वेगवान माऱयाने प्रभावित झाल्यामुळे त्याला संघात स्थान देण्याचा निर्णय. अॅटकिन्सन सुमारे ताशी 95 मैलाच्या वेगाने चेंडू फेकतोय.
– नुकत्याच झालेल्या ‘अॅशेस’ मालिकेत जोरदार कामगिरी करणारे मोइन अली, मार्क वूड, ख्रिस व्होक्स, जॉनी बेअरस्टो, ज्यो रूट आणि बेन स्टोक्स वन डे संघात.

स्टोक्सच्या निर्णयामुळे इंग्लिश चाहत्यांमध्ये उत्साह
कसोटीला रंगतदार करणारा स्टोक्स संघात असायलाच हवा, असे मत इंग्लिश चाहते गेले तीन-चार महिने व्यक्त करत होते. अखेर त्यांच्या प्रयत्नांना इंग्लंडच्या व्यवस्थापनाने कसे का होईना सत्यात उतरवले आहे. स्टोक्सच्या वर्ल्ड कप संघातील समावेशामुळे इंग्लिश चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.

– इंग्लंडचा संभाव्य वर्ल्ड कप संघ – जोस बटलर (कर्णधार), मोईन अली, गस अॅटकिन्सन, जॉनी बेअरस्टॉ, सॅम करण, लियाम लिव्हिंगस्टोन, डेव्हिड मलान, आदिल राशीद, ज्यो रूट, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रीस टॉपले, डेव्हिड विली, मार्क वुड, ख्रिस व्होक्स.

अखेर अफवा खरी ठरली
गेल्या अनेक महिन्यांपासून लंडनमध्ये सोशल मीडियावर बेन स्टोक्सने वन डे निवृत्ती मागे घेतली. तो वर्ल्ड कप खेळणार अशा बातम्या वारंवार व्हायरल होत होत्या. खुद्द स्टोक्सनेच या निव्वळ अफवा आहेत आणि मी ‘अॅशेस’नंतर दीर्घ ट्टीवर जाणार आहे. माझ्यासाठी वन डेचा विषय गेल्या वर्षीच संपल्याचे त्याने जाहीर केले होते. पण अखेर त्याच्या निवृत्ती मागे घेण्याची अफवा खरी ठरली. ना ना बोलता बोलता स्टोक्सला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्यास जोस बटलर यशस्वी ठरला आहे. स्टोक्सच्या झुंजार खेळामुळेच इंग्लंडने आपला पहिलावहिला आयसीसी वर्ल्ड कप 2019 मध्ये जिंकला होता आणि गेले वर्षभर आपल्या ‘बॅझबॉल’मुळे कसोटी कर्णधार बेन स्टोक्सने सर्वांचीच मने जिंकली आहेत. कसोटीला वन डेचा वेग देणारा स्टोक्स खऱयाखुऱया वन डे क्रिकेटमध्ये धमाल करेल, असा विश्वास असल्यामुळे स्टोक्सला संघात घेण्यात आले आहे.