Mega Block – रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या मेगाब्लॉक!

रेल्वे रुळांच्या देखभालदुरुस्तीबरोबरच सिग्नल यंत्रणेतील प्रलंबित कामे करण्यासाठी रविवार, 2 जुलै रोजी उपनगरीय लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारच्या सुट्टीनिमित्त बाहेर पडणाऱयांचे हाल होणार आहेत. 

मध्य रेल्वेकडून माटुंगामुलुंड अप आणि डाऊन धिम्या मार्गावर सकाळी 11.05  ते दुपारी 3.55 या कालावधीत ब्लॉक असणार आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.14 ते दुपारी 3.18 या वेळेत सुटणाऱया धिम्या मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. सदरच्या गाडय़ा शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड स्थानकांवर  थांबतील.  तर ठाणे येथून सकाळी 10.58 ते दुपारी 3.59 या वेळेत अप धिम्या मार्गावरील लोकल मुलुंड आणि माटुंगादरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होणार आहे. 

पनवेलवाशी अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.05 ते सायंकाळी 4.05 पर्यंत ब्लॉक असणार आहे. त्यानुसार पनवेल येथून सकाळी 10.33 ते दुपारी 3.49 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी जाणाऱया अप हार्बर मार्गावरील गाडय़ा आणि सीएसएमटी येथून सकाळी 9.45 ते दुपारी 3.12 या वेळेत पनवेल, बेलापूरकडे जाणाऱया डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द असणार आहेत. तसेच ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलही ब्लॉक कालावधीत रद्द असणार आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेटमुंबई सेंट्रलदरम्यान धिम्या आपडाऊन मार्गावर सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या कालावधीत पाच तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे ब्लॉक कालावधीत धिम्या मार्गावरील सर्व लोकल गाडय़ा चर्चगेटमुंबई सेंट्रलदरम्यान जलद मार्गावरून धावणार आहेत. दरम्यान, जलद मार्गावरील वाहतूक सुरू राहणार असल्याने प्रवाशांनी त्यानुसार आपला प्रवास करावा, असे आवाहन पश्चिम रेल्वेने केले आहे.