मोदी मंत्रिमंडळात फेरबदलाच्या हालचाली; तरुण चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भारतीय जनता पक्षातील संघटनात्मक बदलांनंतर आता केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार आहेत. देशात सध्या तरुणाईचा बोलबाला असून मंत्रिमंडळातही त्यांचे प्रतिबिंब उमटण्याची शक्यता आहे. नव्या बदलांमध्ये जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाईल, असे सूत्रांकडून समजते.

नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सध्या ६९ मंत्री आहेत. नियमानुसार ८१ सदस्यांचे मंत्रिमंडळ असू शकते, त्यामुळे आणखी १२ जागा रिक्त आहेत. आता तातडीने काही बदल होणार आहेत. राज्यसभेचा कार्यकाळ संपलेल्या, पक्ष संघटनेत पद मिळालेल्या आणि अकार्यक्षम मंत्र्यांना नारळ देऊन त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाणार आहे. काही मंत्र्यांकडे असलेला अतिरिक्त कार्यभार नव्या मंत्र्यांकडे सोपवला जाण्याची शक्यता आहे.

गद्दारांना संधी मिळण्याची शक्यता

आम आदमी पक्षाच्या बंडखोर खासदारांपैकी एकाला मंत्रिमंडळात संधी मिळू शकते. शिवसेनेचे बंडखोर खासदार शिंदे गटात गेल्याने त्यांच्या गटाला मंत्रिपदाची बक्षीस मिळण्याची शक्यता आहे. तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांच्या अपात्रतेचा निर्णय अद्याप प्रलंबित असल्याने त्यांना सध्या तरी संधी मिळण्याची शक्यता कमी आहे.

वयाचा निकष तूर्त बाजूला?

मोदी सरकारमधील जवळपास 12 मंत्री हे सत्तरी पार केलेले आहेत. त्यातील काही मंत्री हे भाजपच्या मित्रपक्षांचे आहेत; त्यामुळे त्यांना वयाचा निकष लावला जाण्याची शक्यता कमी आहे. भाजपच्या मंत्र्यांना हा निकष लावला जाऊ शकतो. मात्र तसे झाल्यास पंतप्रधान मोदींच्या वयाची चर्चा नव्याने सुरू होऊ शकते. ती टाळण्यासाठी वयाचा मुद्दा तूर्त बाजूला ठेवला जाण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

बड्या मंत्र्यांनाही डच्चू मिळणार

केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांची पक्षाच्या खजिनदारपदी वर्णी लागली आहे. भाजपच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ नियमानुसार त्यांना मंत्रिपद सोडावे लागण्याची चिन्हे आहेत. एपस्टीन फाइल्समुळे वादात अडकलेले पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी आणि सामाजिक न्याय मंत्री बी. एल. वर्मा यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपत आहे. त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता नसल्याने मंत्रिमंडळातूनही त्यांना डच्चू दिला जाण्याची दाट शक्यता असल्याचे सूत्रांकडून समजते.

गडकरी, फडणवीसांबद्दल तर्कवितर्क

संभाव्य फेरबदलांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील दोन नावांची प्रामुख्याने चर्चा होत आहे. त्यात विद्यमान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश आहे. ई-२० विरोधामुळे गडकरी सध्या वादात आहेत. त्यातच “मी आता थकलोय, जास्त काम करू शकत नाही,” असे वक्तव्य त्यांनी केले आहे. मंत्रिमंडळातून बाजूला होण्याचे हे संकेत नाहीत ना, अशी एक चर्चा आहे. तर दुसरीकडे फडणवीस यांना केंद्रात संधी दिली जाण्याची शक्यता आहे. २०२९ च्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रात मोदींना तरुण व कार्यक्षम मंत्र्यांची गरज आहे. फडणवीस यांच्याकडे उत्तम राजकीय व प्रशासकीय अनुभव आहे. राष्ट्रीय पातळीवर त्यांचा उपयोग करून घेण्याचा विचार केंद्रीय स्तरावर सुरू असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.