कडाक्याच्या उन्हामुळे धरणेही आटत चालली, मुंबईवर 10 टक्के पाणीकपातीचे संकट

राज्यभरात पाऱयाने चाळिशी गाठल्याने ‘घामटा’ निघत असताना वाढलेल्या कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारी धरणे झपाटय़ाने आटत चालल्याने टेन्शन वाढले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱया सात धरणांत सध्या फक्त 20 टक्केच पाणी शिल्लक असून गतवर्षीच्या तुलनेत हा साठा तब्बल सात टक्क्यांनी कमी आहे. यातच हवामान खात्यानेही पुढील काही दिवस असाच ‘उन्हाळा’ राहणार असल्याचा इशारा दिल्याने मुंबईवर 10 ते 15 टक्के पाणीकपातीचे संकट निर्माण झाले आहे.

मुंबईला महानगरपालिकेकडून अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी अशा सात तलावांतून दररोज 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मुंबईला वर्षभर पाणीसाठा सुरळीत सुरू राहण्यासाठी 1 ऑक्टोबर रोजी 1447363 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असते. यानुसार वर्षभराच्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन केले जाते. मात्र गेल्या काही वर्षांपासून मान्सून सक्रिय होण्यास विलंब होऊ लागल्याने तलाव तळ गाठत आहे. त्यामुळे 10 ते 20 टक्क्यांपर्यंत पाणीकपात केली जाते. गेल्या वर्षी 17 ऑक्टोबरपर्यंत मान्सून बरसत होता. मात्र या वर्षी 29 सप्टेंबर रोजी पाऊस पडणे बंद झाले. यामुळे दरवर्षी वाढीव 5 ते 7 टक्के जादा मिळणारे पाणी या वर्षी मिळालेच नाही, पण 1 ऑक्टोबरपासून पाण्याचा वापर मात्र सुरू राहिला. यामुळे या वर्षी पाण्याची तूट दिसत असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

तीन वर्षांची 27 एप्रिलची स्थिती

वर्ष – उपलब्ध पाणीसाठा
2024 – 20.28 टक्के
2023 – 26.60 टक्के
2022 – 29.52 टक्के

समुद्रात निर्माण झालेल्या अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन स्थितीत येणाऱया वाऱयांमुळे उकाडा वाढला आहे. मुंबईत पुढील दोन दिवस पारा एक ते दोन अंशांनी वाढेल, तर ठाणे, पनवेल, पूर्व उपनगरासह रायगड आणि संपूर्ण कोकणात अनेक भागांत पारा 40 अंशांवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संबंधित विभागांना काळजी घेण्यासाठी ‘हिट वेव्ह’चा इशारा देण्यात आला आहे. – सुषमा नायर, हवामान विभाग, मुंबई

उपलब्ध पाणीसाठा (दशलक्ष लिटरमध्ये)

अप्पर वैतरणा 44,568
मोडक सागर 32,194
तानसा 52,814
मध्य वैतरणा 18,039
भातसा 1,33,685
विहार 9174
तुळशी 3078

सध्या राखीव कोटय़ावर मदार

या वर्षी पाणीसाठा खालावल्यामुळे पालिकेने सरकारकडे अप्पर वैतरणा धरणातून 93 हजार 500 मिलियन लिटर व भातसा धरणातून 1 लाख 37 हजार मिलियन लिटर राखीव पाणीसाठय़ाची मागणी केली होती. याला राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यामुळे सद्यस्थितीत मुंबईच्या पाणीपुरवठय़ाची मदार राखीव कोटय़ावर अवलंबून आहे.

सध्या उपलब्ध असणारे पाणी जुलैपर्यंत पुरणारे दिसत असले तरी उकाडा असाच कायम राहिल्यास दहा टक्क्यांवर जलसाठा गेल्यास पाणीकपात लागू होण्याची शक्यता आहे. दरम्यान, घटणाऱया पाणीसाठय़ाबाबत पालिका प्रशासन गंभीर असून 15 मेपर्यंत उपलब्ध पाण्याचा आढावा घेऊन आवश्यकता भासल्यास पाणीकपात करण्याचा निर्णय होऊ शकतो.