गोळीबाराच्या घटनेनंतर मुंबई पोलीस अलर्ट मोडवर

mumbai-police
फाईल फोटो

उल्हासनगरातील पोलीस ठाण्यातल्या  वरिष्ठ निरीक्षकाच्या  केबिनमध्ये आमदाराकडून झालेला गोळीबार मग बोरिवली येथे माजी नगरसेवक  अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून झालेली हत्या, या घटनांनतर मुंबई पोलीस अधिक अॅलर्ट झाले आहेत. यापुढे अशा दुर्दैवी घटना घडू नये याची पोलीस आता विशेष काळजी घेणार आहेत. त्यासाठी प्रत्येक पोलीस ठाण्यातील राजकीय वाद असणारे, शस्त्र बाळगणारे तसेच गुन्हेगारांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना वरिष्ठांकडून देण्यात आल्या आहेत.

मिंधे सरकारच्या कार्यकाळात नागरिकांच्या सुरक्षेचे अक्षरशः तीनतेरा वाजले आहेत. गेल्या महिन्यात विविध ठिकाणी पुर्ववैमन्यस, राजकिय वाद तसेच वर्चस्वाच्या वादातून गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. बोरीवलीत तर गोळीबाराची हद्दच झाली. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते व माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र व माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. गोळीबारासारख्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षितता आणि घबराटीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे मुंबई पोलीस घोसाळकर यांच्या दुर्देवी हत्येनंतर अधिक अॅलर्ट मोडवर आली आहे. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यांना वरिष्ठांकडून  विशेष सुचना देण्यात आल्या आहेत. पोलीस ठाणे हद्दीत किती जणांकडे शस्त्र आहेत. त्यांच्याकडे परवाना आहे का, त्यांचे कोणाशी कुठल्याही प्रकारचे वाद आहेत का आदी इत्यंभूत माहिती रोजच्या रोज ठेवण्याबरोबर त्यांच्याकडून कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याबाबत अधिकची काळजी घेण्याबाबत सांगण्यात आले आहे.

 शहरात 11 हजाराहून अधिक शस्त्र परवाना धारक

पोलीस ठाणे हद्दीतील गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक, अभिलेखावरील आरोपी यांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यास तसेच त्यांच्याकडून काही होऊ नये याची दक्षता घेण्याच्या वरिष्ठांकडून सुचना देखील करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. शहरात 11 हजाराहून अधिक शस्त्र परवाना धारक असल्याचे समजते. निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राजकिय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले आहे. त्यामुळे त्यातून गोळीबार, मारामारी, हत्येच्या घटना घडू नये. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यावर विशेष भर देण्यास सांगण्यात आले आहे.