मुंबईच्या पाणी कपातीचे चटके ठाण्याला; 30 मेपासून 5 टक्के तर 5 जूनपासून 10 टक्के कपात

मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांतील पाणीसाठ्यामध्ये घट झाली आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून मुंबई महापालिकेने पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे. याच जलवाहिनीतून ठाणे शहरातील काही भागांना पाणीपुरवठा होत असल्याने मुंबईच्या पाणी कपातीचे चटके ठाण्यालाही बसणार आहेत. ठाणे शहरातील काही भागांत 30 मेपासून 5 टक्के तर 5 जूनपासून 10 टक्के पाणी कपात होणार असून पाण्याचा अपव्यय टाळून पाणी बचत करण्याचे आवाहन पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयामध्ये अवघे 10 टक्केच पाणी शिल्लक राहिले आहे. ठाणे पालिका क्षेत्राला विविध प्राधिकरणांच्या माध्यमातून पाणीपुरवठा होत आहे. यामध्ये मुंबई पालिकेकडून दररोज 85 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा ठाणे शहराला होत आहे. हे पाणी वागळे आणि नौपाडा अशा परिसरांना दिले जात आहे. मात्र आता मुंबईत पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला असल्याने ठाणे शहराच्या ज्या भागात मुंबईकडून पाणीपुरवठा होतो त्या भागात ही कपात लागू करण्यात येणार आहे.

या परिसराला फटका हाजुरी, लुईसवाडी, रघुनाथनगर, नामदेव वाडी, साईनाथनगर, रामचंद्रनगर, किसननगर, शिवाजीनगर, पडवळनगर, अंबिकानगर, ज्ञानेश्वरनगर, काजूवाडी, जिजामातानगर, बाळकूम पाडा नं 1, लक्ष्मीनगर, आंबेडकरनगर, मानपाडा, कोपरी धोबीघाट, गावदेवी, टेकडीवाडी, भटवाडी, इंदिरानगर, आनंदनगर या परिसरात पाणी कपातीचा फटका बसणार आहे.

अपव्यय टाळण्यासाठी हे करा
■ आवश्यक तितकेच पाणी पेल्यामध्ये घेऊन प्यावे. आंघोळीसाठी शॉवरचा वापर न करता बादलीमध्ये पाणी घेऊन आंघोळ करावी. नळ सुरू ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळावे.
■ घरातील कामे करताना पाण्याचे नळ वाहते ठेवू नका. त्याऐवजी भांड्यांमध्ये पाणी घेऊन कामे उरकावीत.
■ वाहने भांड्यामध्ये पाणी घेऊन ओल्या कापडाने पुसावीत. घरातील फरशी, गॅलरी, व्हरांडा, जिने धुऊन काढण्याऐवजी ओल्या कापडाने पुसून घ्या.
■ आदल्या दिवसाचे पाणी शिळे समजून फेकू नये.
■ हॉटेलमध्ये ग्राहकांना आवश्यक असेल तेव्हाच पेल्यांमध्ये पाणी द्यावे. अथवा पाण्याची बाटली पुरवावी.
■ गृहनिर्माण संस्थांमध्ये कोठेही गळती आढल्यास तत्काळ दुरुस्ती करावी. यामुळे पाण्याची बचतही होईल आणि पाणी दूषित होणार नाही.
■ छतावरील पाण्याच्या टाक्या भरताना त्या ओव्हरफ्लो होणार नाहीत, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.