नागपूरच्या काव्य अग्रवालची कमाल; मुलांसाठी लिहिली भगवद्गीता

नागपूर येथील दहा वर्षांच्या काव्य अग्रवालने कमाल करून दाखवली आहे. काव्यने संपूर्ण भगवद्गीता स्वतःच्या शब्दांत लिहिण्याचा विक्रम केला आहे. काव्यने ही ‘किडटॅस्टिक’ नावाची भगवद्गीता लिहिली असून त्याची नोंद इंडिया आणि आशिया बुकमध्ये करण्यात झाली आहे.

सर्वात लहान वयात भगवद्गीता लिहिण्याचा विक्रम काव्यने केला आहे. केवळ दोन महिन्यांत त्याने लिखाणाचे काम पूर्ण केले. ‘किडटॅस्टिक’ मध्ये काव्यने  भगवद्गीतेच्या श्लोकांचा अर्थ सांगितला आहे. अध्यायांचे स्वतःच्या शब्दांत भाषांतरदेखील केले.  प्रत्येक अध्यायातून तो काय शिकला हेदेखील त्याने लिहिले आहे.

काव्य म्हणाला, सुरुवातीपासूनच मला भगवद्गीतेविषयी अधिकाधिक जाणून घेण्यास रस होता. त्यानंतर मी यासंबंधी एक कार्यशाळा पूर्ण केली. त्यामुळे संस्कृत श्लोक शिकण्यास आणि वाचण्यास आणि भगवद्गीतेचे विविध आयाम समजून घेऊन संशोधन करण्यास प्रेरित झालो. आई रश्मी अग्रवाल, बाबा राज अग्रवाल आणि आजी-आजोबांच्या पाठिंब्यामुळे मला पुस्तक लिहिण्यात प्रोत्साहन मिळाले.

खास डिझाईन अन् चित्रे

काव्यने केवळ पुस्तकाचे लिखाणच केलेले नाही, तर पुस्तकाचे डिझाईनदेखील केले आहे. पुस्तक वाचताना मुलांची आवड लक्षात घेऊन काव्यने रंगीबेरंगी चित्रे, भगवान श्रीकृष्णाच्या कथा आणि रंगरंगोटीची जागा समाविष्ट केली. सध्या पुस्तक इंग्रजी भाषेत उपलब्ध असून येत्या काळात इतर भाषांत ते उपलब्ध करून देण्यात येईल. भविष्यात ऑडिओ बुकसुद्धा काढण्याचा विचार सुरू आहे, असे काव्यने सांगितले.

काव्यच्या विक्रमाची नोंद सप्टेंबरमध्ये ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ तर ऑक्टोबरमध्ये ‘आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’मध्ये झाली. ‘गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड्स’साठीची प्रक्रिया सुरू असल्याचे त्याचे वडील राज अग्रवाल यांनी सांगितले.