
नाना पाटेकर हे नाव उच्चारताच आपल्या डोळ्यासमोर एक कसदार कलाकार, रांगडे व्यक्तिमत्व येते. अभिनय, सामाजिक कार्य यासह त्यांचे क्रिकेट आणि शूटिंग या खेळांवरही विशेष प्रेम होते. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावणारे नाना रायफल शूटिंगमध्येही निष्णात होते. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर 300 मीटर आणि 50 मीटर रायफल शूटिंग स्पर्धांमध्ये त्यांनी अनेकदा भाग घेतला. विशेष म्हणजे महाराष्ट्रासाठी त्यांना कांस्यपदकही जिंकले होते हे अनेकांना माहितीही नसेल. या अफाट कौशल्यामुळे शूटिंग विश्वामध्ये त्यांना ‘रिनॉउंड शॉट’ बहुमानही मिळाला होता.
नाना पाटेकर हे वयाच्या चाळीशीमध्ये शूटिंगकडे वळले. 2011 मधील एका मुलाखतीत त्यांना याबाबत माहितीही दिली होती. मी अनेकदा शूटिंग स्पर्धांच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणा म्हणून जायचो. तिथूनच मला वेगवेगळ्या बंदुका हाताळण्याची आवड निर्माण झाली. हळूहळू माझे ध्येय इतके अचूक झाले की, मी पाण्याच्या बाटलीची झाकणेही सहज उडवू लागलो, असे नाना पाटेकर यांना सांगितले होते. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत सविस्तर वृत्त दिले आहे.
नाना पाटेकर यांना 2001 मध्ये वयाच्या पन्नाशीमध्ये व्यावसायिक स्पर्धांमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला होता. पुण्याच्या बालेवाडी आणि म्हाव येथील शूटिंग रेंजवर त्यांना 300 मीटर बिग-बोर आणि 50 मीटर रायफल प्रोन प्रकारात तासन्तास सराव केला.
2004 मध्ये इंदूर येथील बीएसएफच्या रेवती रेंजवर झालेल्या 48 व्या नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये नानांनी 300 मीटर बिग-बोर प्रकारात रौप्यपदक पटकावले होते. तीन वर्षांनंतर 2007 मध्ये त्यांनी 600 पैकी 549 गुण मिळवत 49 स्पर्धकांमध्ये 13 वा क्रमांक पटकावला आणि महाराष्ट्र संघाला कांस्यपदक मिळवून दिले होते.
Nana Patekar – नाना पाटेकर यांचं खरं नाव, शिक्षण ते कौटुंबिक पार्श्वभूमी; जाणून घ्या एका क्लिकवर
2007 मधील राष्ट्रीय स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांना ‘रिनॉउंड शॉट’ ही पदवी मिळाली. यामुळे त्यांना परदेशातून ड्यूटीफ्री रायफल आयात करण्याची सवलत मिळाली. त्या वेळी नानांनी त्यांच्या नेहमीच्या बिनधास्त शैलीत म्हटले होते, मला ही नवीन रायफल तर मिळू द्या, मी तुम्हाला सांगतो की मी 600 पैकी 590 गुण नक्कीच मिळवून दाखवेन!
दरम्यान नानांनी वयाची साठी ओलांडल्यानंतरही राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये आपला सहभाग कायम ठेवला. आऊटडोर शूटिंगच्या काळातही जिथे जवळपास रेंज उपलब्ध असेल तिथे नाना आपली रायफल आणि साहित्य घेऊन सरावाला पोहोचायचे.





























































