नसीम खान यांचा काँग्रेसच्या स्टार प्रचारक कमिटीचा राजीनामा; वंचित किंवा महायुतीत जाणार नाही

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसने वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसचे नेते नसीन खान यांनी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांच्या यादीतून राजीनामा दिला आहे. या पुढच्या निवडणूक टप्प्यात काँग्रेसच्या एकाही उमेदवाराचा प्रचार करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, वर्षा गायकवाड यांना माझा विरोध नाही. वर्षा गायकवाड माझी बहीण आहे. माझा कोणच्याही उमेदवारीला विरोध नाही. पण पक्षाने राज्यात एक तर अल्पसंख्याक द्यायला पाहिजे होता. त्याबद्दल लोक मला विचारत आहेत. मी समाजाला काय उत्तर द्यावे हा माझ्यासमोर प्रश्न आहे.

काँग्रेसच्या स्टार प्रचारक समितीचा राजीनामा दिल्यावर वंचित किंवा महायुतीने पक्षात येण्याची ऑफर दिली आहे का या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, त्यांची मला ऑफर आलेली नाही. त्यामुळे त्यांच्याकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. एमआयएमने ऑफर दिली आहे. पण त्याबद्दल मला भाष्य करायचे नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

पक्षाचे नुकसान करणार नाही

मी सध्या काँग्रेसमध्ये आहे. राहुल गांधी आमचे नेते आहेत. सोनिया गांधी नेत्या आहेत. काँग्रेसचे विचारधारा आमच्या रक्तात आहे असे सांगून ते पुढे म्हणाले की, मी पक्षाचा कर्मठ कार्यकर्ता आहे. मला जी जबाबदारी दिली ती पार पाडली. मला राजस्थान, गुजरात, गोवा, बंगाल, कर्नाटक, तेलंगणाची जबाबदारी दिली ती मी प्रामाणिकपणे पार पाडलीपक्षाला नुकसान होईल असे मी काही करणार नाही. प्रश्न माझ्या नाराजीचा नाही. पण समाजाची भावना निर्माण झाली आहे ती मी मांडली, असे नसीम खान अन्य एका प्रश्नावर उत्तर देताना म्हणाले.