विधान परिषदेच्या निवडणुकीत सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात शिंदे गटाच्या नरेंद्र दराडेंना कमळाबाईच्या बंडखोराने पराभवाचा धक्का दिला. महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात असणारे नरेंद्र दराडे पडले आणि येथून भाजपचे बंडखोर गोकुळ गिते जिंकले. निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र दराडे यांचा मुलगा कुणाल दराडे यांनी भाजपने केसाने गळा कापला, असा आरोप करत थयथयाट केला. दरम्यान, मिंध्यांनी जिंकलेल्या गीतेंना पळवून दराडेंना आणखी एक धक्का दिला.
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी महायुतीकडून अधिकृत उमेदवार म्हणून माजी आमदार नरेंद्र दराडे यांना उमेदवारी झाल्यापासून शिंदे गट व भाजपात धुसफूस होती. मंत्री महाजन यांचे समर्थक गणेश गिते आणि त्यांचे भाऊ गोकुळ गिते व प्रसाद हिरे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करत दराडे यांना थेट आव्हान दिले होते. दरम्यान, गणेश गिते यांनी अर्ज मागे घेतला. मात्र, त्यांचे बंधू गोकुळ गिते आणि हिरे यांनी माघार घेतली नव्हती. अर्ज माघारीची तारीख उलटल्यावर हिरे यांनी दराडे यांना पाठिंबा दिला. मात्र, मोठय़ा मनधरणीनंतर गोकुळ गिते यांनी प्रचार थांबवला खरा, पण भाजपने पडद्यामागून केलेल्या राजकारणामुळे बंडखोर गोकुळ गितेंनी बाजी मारत नरेंद्र दराडे यांना पराभवाची धूळ चारली.
पहिल्या फेरीतच बाजी
नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी 619 पैकी 618 मतदारांनी मतदान केले. त्यातील 13 मते अवैध ठरली. विजयासाठी 303 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता. गोकुळ गिते यांनी पहिल्या फेरीतच 357 मते मिळवत या निवडणुकीत बाजी मारली, तर नरेंद्र दराडे यांना 248 तर प्रसाद हिरे यांना शून्य मते मिळाली.
बंडखोर गोकुळ गिते होणार शिंदे गटाचे सहयोगी सदस्य
नाशिकमध्ये भाजपचे बंडखोर अपक्ष गोकुळ गीते विजयी होताच त्यांना शिंदे गटाने पळवले. दुपारीच नाशिकमध्ये येऊन मंत्री उदय सामंत हे गीते यांना विशेष विमानाने सोबतच मुंबईला घेऊन गेले. मुंबईत आल्यावर गीते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी विधान परिषदेत शिंदे गटाचा सहयोगी सदस्य म्हणून सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे निवडणुकीत पराभूत झालेल्या नरेंद्र दराडे यांना चांगलाच धक्का बसला आहे.
दराडे पितापुत्रांचा संताप
महायुतीमधील तिन्ही पक्षांनी गद्दारी केली. आपला विश्वासघात केला. महायुतीकडे 475 मते होती. सगळे प्रामाणिक राहिले असते तर नाशिकमध्ये असा निकाल लागला नसता, असे नरेंद्र दराडे म्हणाले. दरम्यान, दराडे यांचे पुत्र कुणाल यांनी शिंदे गटाचा केसाने गळा कापला, असा संताप व्यक्त केला. ‘घरका भेदी लंका ढाएँ’ असे म्हणत त्यांनी मित्रपक्षांनीच घात केल्याचे सांगितले.
कार्यकर्त्यांनी खिंड लढवून जिंकवले, महाविकास आघाडीने ताकद दिली – गिते
मी माझ्या नेत्यांना शब्द दिल्यापासून प्रचार थांबवून घरी बसलो होतो, मात्र कार्यकर्त्यांनी खिंड लढवून मला जिंकून दिले. महाविकास आघाडी आणि मालेगावची इस्लाम पार्टी यांनी निवडणुकीत मला ताकद दिली, अशी प्रतिक्रिया गोकुळ गिते यांनी विजयानंतर दिली. मतदारांनी दराडेंना या निवडणुकीत नाकारले आहे, मागच्या कार्यकाळात दराडे यांनी एकाही मतदाराला निधी दिला नाही. तसेच या निवडणुकीच्या वेळी त्यांनी माझा बाप काढला, म्हातारा झालास का? असे म्हणून माझी प्रतारणा केली. त्यानंतर ही निवडणूक आपल्या कार्यकर्त्यांनी हातात घेतला, असे गिते म्हणाले.
दराडेंना कमी मते हा संशोधनाचा विषय – महाजन
नरेंद्र दराडे यांचा पराभव हा आमच्यासाठी धक्कादायक आहे. महायुतीकडे मोठय़ा प्रमाणात मते असताना दराडेंना कमी मते कशी पडली हा खरा संशोधनाचा विषय आहे. विश्वासघात आमच्या रक्तात नाही आणि पक्षाची संस्कृती नाही, अशी प्रतिक्रिया भाजप नेते मंत्री गिरीश महाजन यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
नको अटी नको शर्ती… शेतकऱयांना हवी कर्जमुक्ती!
विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधान भवनाच्या पायऱयांवर या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सत्ताधाऱयांनी दिलेले वचन पूर्ण करावे, नको अटी नको शर्ती… शेतकऱयांचा सातबारा कोरा करावा, अशी आक्रमक मागणी या आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आली.































































