कोरोनाच्या JN.1व्हेरिएंटने चिंता वाढवली; देशात रुग्णांची संख्या 109 वर, सावधगिरीचा इशारा

जगभरात कोरोनाच्या JN.1व्हेरिएंट हातपाय पसरत आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. आता हा व्हरिएंटचे रुग्ण देशातही वाढत असल्याने चिंता आणखी वाढली आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने सावधगिरी बाळगण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 529 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुले देशभरात सक्रीय रुग्णांची संख्या 4,093 झाली आहे. तसेच गेल्या 24 तासांत तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन रुग्ण कर्नाटकातील तर एक रुग्ण गुजरातचा आहे.

कोरोनाचा सब व्हेरिएंट JN.1 च्या 40 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. 26 डिसेंबरपर्यंत देशभरातील नवीन व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या 109 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार गुजरातमध्ये 36, कर्नाटकात 34 आणि गोव्यात 14, महाराष्ट्रात 9, केरळमध्ये 6, राजस्थान आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 4 आणि तेलंगणामध्ये 2 रुग्ण आढळले आहेत. सब व्हेरिएंटचे रुग्ण सध्या गृह विलगीकरणात आहेत.

JN.1 सब व्हेरिएंट सर्वप्रथम ऑगस्टमध्ये आढळला होता. हा ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2.86 पासून तयार झाला आहे. 2022 च्या सुरुवातीला, BA.2.86 हे कोरोना प्रकरणांमध्ये वाढ झाली होती. BA.2.86 मोठ्या प्रमाणावर पसरला नाही. मात्र,आता तज्ज्ञांची चिंती वाढली कारण BA.2.86 च्या स्पाइक प्रोटीनमध्ये अतिरिक्त म्यूटेशन्स होते आणि तशाच प्रकारे JN.1 च्या स्पाइक प्रोटीनमध्ये अतिरिक्त म्यूटेशन्स आहेत. जागतिक स्तरावर रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. JN.1 – Omicron चा सब व्हेरिएंट चांगली प्रतिकारशक्ती असलेल्यांना देखील सहजपणे संक्रमित करू शकतो. यूएस सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (CDC) ने याचे वर्णन यूएसमध्ये सर्वात वेगाने वाढणारा व्हेरिएंट म्हणून केलं आहे. त्यामुले तज्ज्ञांचीही चिंता वाढली असून सावधगिरी बाळगण्याचा इशारा देण्यात आला आहे.