
ग्रेटर नोएडात दोन स्कूल बसची समोरासमोर धडक झाल्याने अपघातात चालकासह 12 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले आहेत. चालकाची प्रकृती गंभीर आहे. जखमी मुलांना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ग्रेटर नोएडाच्या दादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रूपवास गावाजवळ सोमवारी सकाळी ही घटना घडली.
एबीपी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, सर्व जखमी मुले एका खाजगी शाळेत शिकतात. अनियंत्रित स्कूल बसने विद्यार्थ्यांना घेऊन चाललेल्या स्कूल बसला समोरून धडक दिली. चालकाने बचाव करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. या बसमध्ये 20 ते 22 विद्यार्थी होते. या अपघातात 12 हून अधिक मुले जखमी झाली असून एकाची मुलाची प्रकृती गंभीर असल्याचे कळते. जखमी मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले.


























































