अखेर प्रज्वल रेवन्ना शरण येणार; व्हिडीओ जारी करत दिली माहिती

लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत कर्नाटकात सेक्स स्कँडल प्रकरण उघडकीस आले आणि देशभरातील राजकारण तापले. या प्रकरणात प्रज्वल रेवन्ना प्रमुख आरोपी आहे. तो माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांचा नातू आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याच्या प्रचारासाठी आले होते. त्यामुळे विरोधकांनी प्रज्वल रेवन्नाचा मुद्दा उपस्थित करत भाजपला कोंडीत पकडले होते. मोदी आणि भाजपने हात वर करत कर्नाटक सरकारकडे बोट दाखवले. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा वाढली होती.

प्रज्वल राजनैतिक विशेषाधिकारांचा वापर करत देशाबाहेर पळून गेल्याची चर्चा होती. विरोधकांच्या टीकेला धार चढली होती. त्यानंतर देवेगौडा यांनी प्रज्वलला इशारा दिला होता. हा माझा निर्वाणीचा इशारा आहे, देशात परत ये, माझ्या संयमाची परीक्षा घेऊ नको, असे त्यांनी प्रज्वलला बजावले होते. आता प्रज्वल देशात परतणार असून तपास यंत्रणांना सामोरा जाणार आहे. अखेर प्रज्वल रेवन्ना शरण येणार असून त्याने एक व्हिडीओ जारी करत ही माहिती दिली आहे.

कर्नाटक सेक्स स्कँडलमधील प्रमुख आरोपी प्रज्वल रेवन्ना 31 मे रोजी तपास यंत्रणांसमोर हजर होणार असल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर प्रज्वल रेवन्ना फरार होता. तो जर्मनीत असल्याची चर्चा होती. आता प्रज्वल रेवन्नाने व्हिडीओद्वारे एक निवेदन जारी करत आपल्या पालकांची माफी मागितली आहे. तसेच माझ्याविरोधात राजकीय षडयंत्र रचले गेले आहे. त्यामुळे मी मानसिक तणावाखाली होतो. मात्र, आता 31 तारखेला सकाळी आपण तपास यंत्रणांसमोर हजर राहून चौकशीला सहकार्य करेन. मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. माझ्याविरोधात खोटा आरोप केला जात आहे. तपासातून सर्व सत्य समोर येईल. कायद्यावर माझा भरवसा आहे, असेही प्रज्वलने व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

परदेशात मी कुठे आहे याची माहिती न दिल्याबद्दल मी कुटुंबातील सदस्यांची मी माफी मागतो, असेही त्याने म्हटले आहे. मी माझ्या वकिलांमार्फत तपास यंत्रणांना पत्र लिहून 7 दिवसांची मुदत मागितली होती. आता आपण शुक्रवारी म्हणजे 31 मे रोजी तपास यंत्रणांसमोर हजर होणार आहे, असेही प्रज्वल रेवन्नाने म्हटले आहे.