आगामी लोकसभा निवडणुकीवर या निकालांचा परिणाम होणार नाही; शरद पवार यांचे निवडणूक निकालांवर महत्त्वाचे विधान

पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये भाजपला आघाडी मिळताना दिसत आहे. तर तेलंगाणामध्ये काँग्रेसने बीआरएसला मागे टाकले आहे. या निवडणूक निकालांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली आहे. आजच्या निकालामध्ये प्रादेशिक मुद्दे महत्त्वाचे ठरले असून प्राथमिक निकालात भाजपला अनुकूल ट्रेंड दिसून येत आहे. मात्र, संध्याकाळी 6 वाजेनंतर चित्र स्पष्ट होईल. त्यामुळे त्यानंतरच यावर प्रतिक्रिया देता येईल, असे शरद पवार म्हणाले. तसेच या निकालांचा इंडिया आघाडीवर तसेच 2024 च्या निवडणुकांवर कुठलाही परिणाम होणार नाही, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

मतमोजणी सुरू असून, निकालाचे चित्र सहा वाजेनंतर स्पष्ट होईल, त्यामुळे त्यानंतरच त्यावर बोलणे योग्य ठरेल. या निकालाचा इंडिया आघाडीवर कुठलाही परिणाम होणार नाही. तसेच 2024 च्या लोकसभा निवडणुकीवरही त्याचा परिणाम होणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात भाजप आणि मित्र पक्षांची सत्ता येणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. बीआरएसचे राज्याकडे दुर्लक्ष झालं होतं. तिथे राहुल गांधींच्या झालेल्या यशस्वी सभेनंतर तेलंगाणामध्ये परिवर्तन होणार याचा अंदाज आला होता, अशी प्रतिक्रिया त्यांनी तेलंगणातील निकालांबाबत दिली.

ईव्हीएमबाबतची तक्रार आपल्यापर्यंतही आली आहे. मात्र, त्यात जोपर्यंत तथ्य समजत नाही, तोपर्यंत यावर बोलणे योग्य नाही, याची योग्य यंत्रणांमर्फत तपासणी होण्याची गरज आहे. या निवडणुकांचा आगमी लोकसभा निवडणुकावर परिणाम होईल, असे वाटत नाही. मंगळवारी मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवास्थानी इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. त्यात या मुद्द्यासह इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. ज्या राज्यात निवडणुका झाल्या तेथील तज्ज्ञांकडून मते मागवण्यात येतील, त्यावर चर्चा केल्यानंतर आम्ही आमचे मत मांडणार आहोत. 2024 मध्ये महाराष्ट्रात भाजप आणि मित्रपक्षांचे सरकार देशात आणि राज्यात येणार नाही, हे स्पष्टपणे दिसत आहे, असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. महाविकास आघाडी आणि इतर पक्षांना सोबत घेत आम्ही सक्षण पर्याय निर्माण करणार आहोत.

भाजपशी जवळीक निर्माण झाल्याने अजित पवार भाजपबाबत बोलत आहेत. भाजपशी जवळीक झाल्याने त्यांना पूरक भूमिका ते मांडतात.आम्ही धर्मनिरपेक्ष विचारांचे आहोत, यात कोणतेही दुमत नाही, त्यामुळे कोणी काहीही आरोप केले तरी जनतेला योग्य काय ते माहिती आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. देशात जीतीनिहाय जनगणना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मराठा आणि धनगर आरक्षणाबाबत आमची भूमिका ठाम आहे. कोणत्याही घटकावर अन्याय होऊ नये, असे आमचे मत आहे. त्याचप्रमाणे सरकारने योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. विनाकारण निर्माण होणाऱ्या या वादात भाजपचा हात असल्याची शक्यता जनतेतून व्यक्त होत आहे. त्यामुळे कोणवरही अन्याय न करता याबाबत योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. जनतेच्या, शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. अतिवृष्टी, दुष्काळ, अवकाळी पाऊस या समस्यांकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, काही मुद्द्यांमुळे हे प्रश्न मागे पडत आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.