मुंबई पालिका निवडणुकीचे पडघम; नवीन प्रभाग रचना आराखडा सोमवारी निवडणूक आयोगाला सादर होणार

पालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने तयार केलेला वाढीव प्रभागांचा आराखडा सोमवारी राज्य निवडणूक आयोगाला सादर करण्यात येणार आहे. यामध्ये मतदान केंद्रे, मतदार यादी, प्रभागांचे सीमांकन, बूथ यासह वाढीव 9 प्रभागांची यादी सादर केली जाणार आहे. या आराखडय़ानुसार प्रभागांची संख्या 227 वरून 236 वर जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका फेब्रुवारी 2022 मध्ये पार पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने निवडणुकीसाठी आवश्यक तयारी सुरू केली आहे. पाच वर्षांत मुंबईत वाढलेल्या लोकसंख्येमुळे 9 प्रभाग वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला आहे. हिवाळी अधिवेशनात 236 प्रभागांवर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर पालिकेच्या निवडणूक विभागाने प्रभाग रचनेत सुधारणा केल्या असून याबाबतचा आराखडा निवडणूक आयोगाला सादर करण्यात येईल. निवडणूक आयोगाकडून त्यावर हरकती-सूचना मागविण्यात येतील. त्यात काही बदल असल्यास निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार त्यात आवश्यक बदल करून अंतिम आराखडा सादर केला जाईल असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

 निवडणूकपूर्व कामे वेळेत करणार

मुंबई महानगरपालिकेची मुदत 8 मार्च 2022 रोजी संपुष्टात येत आहे. त्यामुळे पालिकेची मुदत संपण्यापूर्वी निवडणूकपूर्व कामे पूर्ण करण्यासाठी पालिका वेगाने काम करीत असून वाढीव प्रभागांसह सर्व बाबींचा आराखडा निवडणूक आयोगाला सोमवारी सादर करण्यासाठी निवडणूक आयोगाकडून पत्राद्वारे कळवण्यात आले असल्याचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

 असे होणार काम

  • प्रभाग रचनेचा मसुदा अंतिम करणे
  • त्यानुसार आरक्षणाच्या सोडती काढणे
  • मतदार यादी अंतिम करणे
  • कर्मचाऱयांची नियुक्ती
  • मतदान केंद्रांची तयारी