सिगारेटच्या पाकिटावरून हॉटेलात गोळीबार

परळी जवळील एका हॉटेलमध्ये एका अज्ञात इसमाने हवेत गोळीबार केला. ही घटना अंबाजोगाई रोडवर असलेल्या कन्हेरवाडी शिवारातील यशराज हॉटेलवर रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली. सदर घटना सीसीटिव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

रात्री 10 वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पियोतून तीन अज्ञात व्यक्ती उतरले. त्यापैकी एकाने सिगारेटचे पाकिट मागितले. हॉटेल चालकाने पाकिट पुढे करत 150 रूपये किंमत सांगितली. परळीमध्ये एका पाकिटाचे 100 रूपये घेतले जात असताना इथे 150 रूपयांना का विकले जात आहे असे म्हणत स्वत: जवळील पिस्तूल बाहेर काढत हवेत गोळीबार केला. या गोळीबारामुळे परिसरात घबराटीचे वातावरण झाले. गोळीबार करणारे नेमके कोण होते याचा शोध पोलिस करत आहेत. तसेच या तीन अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्व प्रकरणाचा अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.