वेब न्यूज – गुगल, फेसबुकला पुन्हा दणका

>> स्पायडरमॅन

‘जगावर राज्य करण्याची स्वप्ने बघणाऱ्या सोशल मीडियातील दिग्गज असलेल्या गुगल आणि फेसबुक या कंपन्यांना पुन्हा एकदा दणका बसलेला आहे. आपण बरेचदा या सोशल मीडिया कंपन्यांना होत असलेले दंड, त्यांच्यावर होत असलेल्या कारवाया, याबद्दल वाचत असतो. नुकतेच रशियन सरकारने गुगल आणि फेसबुक (म्हणजे आजकालचे नवीन नाव ‘मेटा’) या दोन प्रमुख सोशल मीडिया कंपन्यांना जबर दंड ठोठावला आहे.

कायद्याचे आणि नियमांचे पालन न करणे आणि बजावलेल्या नोटिसांकडे दुर्लक्ष करणे, असे आरोप या कंपन्यांवर लावण्यात आले आहेत. हिंदुस्थानातदेखील फेसबुक किंवा ट्विटरसारख्या माध्यमातून समाजविघातक शक्ती कशा काम करतात याचा अनुभव घेतलेला आहे. एखादी चुकीची पोस्ट अथवा एखादे द्वेष पसरवणारे ट्विट दंगलसुद्धा घडवून आणू शकते याचा अनुभव आपण घेतलेला आहे. रशियानेदेखील अशाच कारणांखाली ही कारवाई केलेली आहे.

रशियन सरकारने सूचना देऊनदेखील गुगल आणि फेसबुकने नशेसाठी वापरले जाणारे पदार्थ, विविध प्राणघातक हत्यारे, अतिरेकी आणि धार्मिक द्वेषाने भरलेल्या पोस्ट हटवल्या नाहीत. तसेच सरकारला विरोध करणाऱ्या, हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्यामुळे तुरुंगात असलेल्या काही लोकांच्या समर्थनार्थ लिहिला गेलेला मजकूरदेखील हटवलेला नाही. अशा विविध कारणांमुळे गुगलला तब्बल 7.2 अरब रुबल (साधारण 9.84 करोड डॉलर) आणि फेसबुकला 1.9 अरब रुबल (साधारण 2.72 करोड डॉलर) इतका जबरी दंड ठोठावलेला आहे. हिंदुस्थान सरकारदेखील या सोशल कंपन्यांविरुद्ध नवीन कायदे बनवण्याच्या तयारीत आहे. अशा वेळी आतातरी या कंपन्या यातून काही धडा घेऊन आपली कार्यपद्धती बदलतील का, हे बघणे औत्सुक्याचा विषय आहे.