हैदराबादी बिर्याणी, अलिबागची पोपटी, चंपारण मटणावर खवय्यांनी मारला ताव

विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारपासून सुरू झालेल्या परळ-लालबाग फूड फेस्टिव्हलला खवय्यांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. हैदराबादी बिर्याणी, अलिबाग स्पेशल पोपटी चिकन, बिहारचे चंपारण मटण, आगरी चिकन, नागपूरचे सावजी चिकन अशा लज्जतदार पदार्थांवर खवय्ये ताव मारत आहेत. परळच्या कामगार मैदानात रविवार, 28 जानेवारीपर्यंत हा खाद्य संस्कृती महोत्सव सुरू राहणार आहे.

विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने परळ-लालबाग फूड फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात लज्जतदार पदार्थांची मेजवानी चाखायला मिळत आहे. दरम्यान, एकूण 52 स्टॉल असलेल्या या खाद्य महोत्सवाला भेट देऊन विविध राज्ये आणि महानगरांच्या खाद्य संस्कृतीचा आस्वाद मुंबईकरांनी घ्यावा, असे आवाहन आमदार विठ्ठल चव्हाण प्रतिष्ठानचे सचिव पराग चव्हाण यांनी केले आहे.

 

चवदार, चविष्ठ काय काय आहे?

राजू चंपारणच्या स्टॉलवर बिहारी पद्धतीने मडक्यात शिजवलेली मटण-चिकन हंडी, फिश हंडीबरोबर थोडेसे खारट असलेले देसी लिट्टी चाखण्यासाठी तर अलिबागच्या अभय पाटील यांच्या स्टॉलवर मडक्यात भाजलेल्या पोपटीचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांनी गर्दी केली. नागपूरच्या नितेश बोबाटे यांच्या स्टॉलवर सावजी मसाल्यात तयार झालेल्या शाकाहारी-मांसाहारी पदार्थांबरोबर सोबटीला धपाटा खायला गर्दी झाली. आगरी पद्धतीच्या जेवणाबरोबर मालवणच्या देवळीतील बाळकृष्ण चव्हाण यांच्या पापलेट, बांगडा, बोंबील, झिंगा, सुरमई, रावस, कोळंबी याची गरमगरम भाकरीबरोबर चव न्यारी आहे. पापड, पिठलं, ठेचा, आंबोळी चटणीबरोबरच शिल्पा डोंगरे यांच्या अस्सल सावंतवाडीच्या लाकडी खेळण्याच्या स्टॉलवर लहानांपासून ते मोठय़ांच्या होम डेकोरसाठी लोकांनी गर्दी केली.

 

पोटपूजेबरोबर लावणी,संगीत स्पर्धेची पह्डणी

एकीकडे चवीने खाणे सुरू असतानाच दुसरीकडे खवय्यांच्या मनोरंजनासाठी विविध मनोरंजनपर कार्यक्रमांची पह्डणी देण्यात आली आहे. सेलिब्रेटी गेम शो, व्हायोलीन वादन, बिट बॉक्स, होम मिनिस्टर, म्युझिकल जुगलबंदी, लावणी स्पर्धा, हळदी- पुंकू समारंभ, कराओके संगीत स्पर्धा, वाद्यवृंद यांच्याबरोबर दररोज लकी ड्रॉ काढून एक पैठणी आणि आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधीही या खाद्य महोत्सवात सर्वांना आहे.