जुहू, कुलाबा, बीकेसीत सर्वाधिक खराब हवा; 200 पेक्षा जास्त ‘एक्यूआय’मुळे टेन्शन

मुंबईत जुहू, बीकेसी आणि नेव्हीनगर कुलाबा येथे सर्वाधिक प्रदूषण होत असल्याचे समोर आल्यामुळे पालिकेचे टेन्शन वाढले आहे. या ठिकाणचा एअर क्वालिटी इंडेक्स (एक्यूआय) 200 हून जास्त असल्याने हवा खराब आहे. त्यामुळे या ठिकाणचे प्रदूषण रोखण्यासाठी पालिकेने तातडीने उपाययोजना करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबईतील हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी ‘सफर’ संस्था आणि पालिकेच्या माध्यमातून एअर क्वालिटी इंडेक्स तपासण्यासाठी यंत्रणा बसवण्यात आल्या आहेत. यानुसार  ‘एअर क्वालिटी इंडेक्स’ (एक्यूआय)  तपासला जातो. यामध्ये 0 ते 50 पर्यंत ‘एक्यूआय’ ‘अतिशय शुद्ध हवा’ मानली जाते. 51 ते 100 दरम्यान  ‘एक्यूआय’ – ‘समाधानकारक हवा’, 101 ते 200 दरम्यान ‘एक्यूआय’ ‘मध्यम दर्जाची हवा’, 201 ते 300 पर्यंत ‘एक्यूआय’- ‘खराब’ हवा समजली जाते. तर 301 ते 400 ‘एक्यूआय’ – ‘अतिशय खराब’ तर 401 ते 500 ‘एक्यूआय’ असल्यास ‘हवेची स्थिती गंभीर’ असल्याचे मानले जाते. सद्यस्थितीत बीकेसी, जुहू, कुलाबा या ठिकाणचा एक्यूआय जास्त असल्याने पालिका उपाययोजना करणार आहे.

तर बांधकाम सील

प्रदूषणाचे नियम पाळले जात आहेत हे पाहण्यासाठी स्कॉडच्या माध्यमातून तपासणी केली जाईल. यामध्ये नियम मोडल्याचे समोर आल्यास स्टॉप वर्क नोटीस, बांधकाम ठिकाण सील करणे अशी कारवाई केली जाऊ शकते, असा इशारा पालिका प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

एफआयआर नोंदवणार

नेव्हीनगर कुलाबा भागात जुन्या इमारती मोठय़ा प्रमाणावर असून धोकादायक इमारती पाडताना प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळले जात नसल्याने या ठिकाणी हवेची गुणवत्ता खालावल्याचे समोर आले आहे.

त्यामुळे आता या भागात तपासणीदरम्यान प्रदूषण नियंत्रणाचे नियम पाळले जात नसल्याचे समोर आल्यास पोलिसांत एफआयआर नोंदवण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.