IPL 2026 – प्रफुल पदार्पणातच पावरफुल, हैदराबादने राजस्थानचा विजयरथ रोखला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नागपूरच्या प्रफुल हिंगेने आपले पदार्पण पावरफुल करताना अपराजित राजस्थान रॉयल्सचा सलग चार सामन्यांचा विजयरथ रोखण्याचा पराक्रम केला. हैदराबादच्या 217 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानला हिंगेने पहिल्याच षटकांत तीन हादरे देत हैदराबादचा विजय निश्चित केला. त्यानंतर रवींद्र जाडेजा आणि डोनोवन फरेराने शतकी भागी रचून केवळ संघाचा दारुण पराभव टाळला. अखेर राजस्थानचा डाव 159 धावांवर संपला आणि हैदराबादने 57 धावांनी दणदणीत विजय नोंदवला. आजच्या पराभवानंतरही राजस्थानचे गुणतालिकेतील अव्वलस्थान कायम आहे.

पहिल्या षटकांतच सामना संपवला

आयपीएलच्या पदार्पणात आणि डावाच्या पहिल्या षटकांत आघाडीच्या तिन्ही फॉर्मातील फलंदाजांना बाद करण्याचा चमत्कार प्रफुल हिंगेने करत क्रिकेटविश्वात आपल्या नावाचा दरारा निर्माण केला. नागपूरच्या हिंगेने आपल्या हातात पहिले षटक टाकण्यासाठी इशान किशनने चेंडू देताच त्याने डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर ‘सिक्सर प्रिन्स’ असलेल्या वैभव सूर्यवंशीला बाद करून खळबळ माजवली. आयपीएलमध्ये ऑरेंज कॅप डोक्यावर मिरवत असलेल्या वैभवला प्रथमच भोपळ्यावर बाद व्हावे लागले. मग चौथ्या चेंडूवर ध्रुव जुरेलचा त्रिफळा उडवून त्याने राजस्थानच्या हृदयाचे ठोके चुकवले. जुरेलही शून्यावर बाद झाला आणि मग हुआन ड्रे प्रटोरियसलाही एकही धाव काढू दिली नाही. परिणामतः हिंगेने पहिल्याच षटकांत राजस्थानची 1 बाद 3 अशी केविलवाणी अवस्था केली. विशेष म्हणजे तिन्ही फलंदाज आपले खातेही उघडू शकले नाही. इथेच राजस्थानचा पराभव निश्चित झाला होता. यानंतर या अनिश्चित खेळात राजस्थानचा एकही माई का लाल संघाला विजयाच्या ट्रकवर आणू शकला नाही.

फरेराजाडेजाचा संघर्ष

हिंगेने पहिल्याच षटकांत तिन्ही फलंदाजांना बाद करत 1 बाद 3 अशी अवस्था केली. यानंतर  दुसऱ्याच षटकांत साकिब हसनने यशस्वी जैसवालची विकेट काढली. पुढच्या षटकांत हिंगेने कर्णधार रियान परागलाही (4) बाद करत राजस्थानची 5 बाद 9 अशी दुर्दशा केली. मग डोनोवन फरेरा आणि रवींद्र जाडेजाने संघाला सावरत पाचव्या विकेटसाठी 118 धावांची भागी रचत संघाला सुस्थितीत आणले. पण या दोघांनी राजस्थानला विजयाच्या ट्रकवर आणता आले नाही. फरेराने 69 धावांची खेळी केली. साकीबने फरेराचा त्रिफळा उडवत ही भागी संपवली आणि मग जाडेजाही (45) धावांवर बाद झाला. त्यानंतर उर्वरित फलंदाजांनी 20 षटके फळंदाजी करण्याचा प्रयत्न केला, पण इशान मलिंगाने 19 व्या षटकांतच राजस्थानचा डाव संपवला. साकिबने 24 धावांत 4 विकेट टिपले. हिंगने 34 धावांत 4 विकेट टिपण्याचा पराक्रम केला. पदार्पणाच्या सामन्यात अॅण्ड्रय़ु टायने 17 धावांत 5 विकेट टिपत सर्वोत्तम कामगिरी केली असली तरी पदार्पणातच पहिल्याच सामन्यात तीन विकेट बाद करणारा हिंगे पहिलाच गोलंदाज ठरला. तोच आजचा सामनावीरही ठरला.

इशानचे शतक हुकले

अभिषेक शर्माने पुन्हा एकदा सर्वांना निराश केले. जोफ्रो आर्चरने पहिल्याच चेंडूवर अभिषेकचा डाव संपवला. पुढे ट्रव्हिस हेडलाही (18) आपल्या बॅटची कमाल दाखवता आली नाही. मात्र त्यानंतर इशान किशनने पुन्हा एकदा कर्णधारास साजेशी खेळी करताना हेडसह 55, हेन्रिक क्लासनसह 88 धावांची भागी रचली. किशनला शतक ठोकण्याची सुवर्णसंधी होती, पण तो  14 व्या षटकांतच 91 धावांवर बाद झाला. त्याने 44 चेंडूंत 6 षटकार आणि 8 चौकार खेचत संघाला सुस्थितीत ठेवले. मग हेन्रिक क्लासन (40), नितीश रेड्डी (28) आणि सलील अरोरा (24) याच्या धडाकेबाज खेळाने राजस्थानला 6 बाद 216 पर्यंत नेले.