लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचा जीवनपट लवकरच, प्रसाद ओक साकारणार प्रमुख भूमिका

अभिनेता, दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी ‘कच्चा लिंबू’, ‘हिरकणी’, ‘चंद्रमुखी’ अशा चित्रपटांतून आपले दिग्दर्शकीय कौशल्य दाखवून दिले आहे. आता ते शाहिरी परंपरतले अजरामर नाव असलेल्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव यांचं जीवनचरित्र मोठय़ा पडद्यावर घेऊन येत आहेत. ‘पठ्ठे बापूराव’ असे या चित्रपटाचे नाव आहे. यामध्ये अमृता खानविलकर ‘पवळा’च्या भूमिकेत दिसणार आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर सोशल मीडियावर या चित्रपटाचे पोस्टर लाँच करण्यात आले.

‘पठ्ठे बापूराव’ चित्रपटाचे लेखन आबा गायकवाड यांनी केले असून छायांकन संजय मेमाणे यांचे आहे.श्रीधर श्रीकृष्ण कुलकर्णी रेठरेकर, महाराष्ट्राच्या शाहिरी परंपरेत ‘पठ्ठे बापूराव’ या नावानं प्रसिद्ध झाले. पठ्ठे बापूरावांनी गण, गौळण, भेदिक, झगडय़ाच्या, रंगबाजीच्या, वगाच्या लावण्या रचल्या. त्यांच्या लावण्या आणि कवनं तमाशा फडातून गायल्या जात होत्या. त्यांनी जीवनात मोठा संघर्ष करावा लागला. पठ्ठे बापूरावांचा हाच जीवनसंघर्ष नव्या पिढीपर्यंत आणण्याचा प्रयत्न प्रसाद ओक, स्वरूप स्टुडिओज आणि डेस्टिनी प्रॉडक्शन्स करत आहेत.