सोलापूर आगारात नोव्हेंबरमध्ये खासगी गाडय़ा येणार; शंभर एसटी बसेसची पडणार भर

सोलापूर राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या राज्यभरातील विविध आगारांतून सुमारे तीन हजारांपेक्षा अधिक एसटी गाडय़ा क्रॅपमध्ये काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासी सेवेसाठी एसटी गाडय़ांची कमतरता भासू लागली असून, त्यासाठी महामंडळाने खासगी गाडय़ा प्रवासी सेवेत वापरण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या नोव्हेंबरमध्ये सोलापूर आगाराला 100 खासगी बसेस मिळणार आहेत.

कोरोना महामारीच्या दरम्यान सोलापूर आगारातील 146 एसटी गाडय़ा रस्त्यावर धावत होत्या. त्यांपैकी जुन्या व जीर्ण झालेल्या 37 एसटी गाडय़ा क्रॅपमध्ये निघाल्या आहेत. सोलापूर आगारातून सध्या 109 गाडय़ा मार्गावर सोडल्या जात असून, प्रवाशांची संख्या लक्षणीय असूनही अपुऱया एसटी गाडय़ांमुळे महामंडळ सेवा देऊ शकत नाही, अशी स्थिती आहे.

राज्यात 18 हजार एसटी गाडय़ा मार्गावर धावत होत्या. गेल्या तीन वर्षांत त्यातील तीन हजार गाडय़ा क्रॅपमध्ये काढण्यात आल्या आहेत. त्यामुळे महामंडळाकडे केवळ 15 हजार एसटी गाडय़ांवर प्रवासी सेवेचा डोलारा अवलंबून आहे. महामंडळाने खासगी तत्त्वावर एसटी गाडय़ा प्रवासी सेवेत वापरण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडय़ांसाठी चालक हा खासगी मक्तेदाराचा राहणार असून, वाहक हा महामंडळाचा राहणार आहे. नोव्हेंबरमध्ये या तत्त्वावरील 100 गाडय़ा सोलापूर आगारास मिळाल्यानंतर जिह्यातील नऊ आगारांसाठी त्या वितरित होतील. परंतु ही संख्या तोकडीच असून, सक्षम सेवेसाठी आणखी 200 गाडय़ा मिळण्याची गरज आहे.

राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात काही खासगी तत्त्वावरील 500 ‘शिवशाही’ बसेस आहेत. या खासगी गाडय़ांचा करार संपणार असून, त्यामुळे खासगी ‘शिवशाही’ गाडय़ा महामंडळाच्या सेवेत राहणार नाहीत. सोलापूर आगारातील सहा ‘शिवशाही’ गाडय़ाही प्रवासी सेवेत असणार नाही. महामंडळाची मालकी असलेल्या ‘शिवशाही’ बसेस सेवेत असतील.

सोलापूरतील सर्वच आगारांमध्ये एसटी बसेसची कमतरता भासत आहे. ग्रामीण भागात धावणाऱया एसटी गाडय़ा अचानक रद्द करून दुसऱयाच मार्गांवर सोडल्या जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्या निधीतून प्रत्येक वर्षी एक एसटी  दिल्यास प्रवासी सेवा सुधारण्यास मदत होईल.

एसटी महामंडळाने इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी ई-बसेस मार्गावर सोडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सध्या काही मार्गांवर ई-बसेस सेवेत आहेत. सोलापूर आगाराला आठवडाभरात सहा ई-बसेस मिळणार असून, त्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे. या गाडय़ा लांब पल्ल्यासठी वापरल्या जातील़